एमएमआरडीए ‘सात महिन्यांत’ पूल पूर्ण करणार ?

तीस महिन्यांत पुलाचे फक्त चार खांब उभे करणाऱ्या एमएमआरडीएने सात महिन्यांत दुर्गाडी पूल बांधून पूर्ण करू असा दावा केला आहे.


प्रतिनिधी, गोपाळ दंडगव्हाळे
कल्याण, ५ ऑक्टोबर

कल्याणमधील वाहतूक कोंडीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेल्या दुर्गाडी पुलाचे काम येत्या ७ महिन्यांत पूर्ण करण्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे.

कल्याणच्या दुर्गाडी पुलाचे कित्येक दिवसांपासून रखडलेले कार्य

कल्याणमधील वाहतूक कोंडीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणाऱ्या दुर्गाडी पुलाच्या कामाबाबत एमएमआरडीएने आता ‘नवी डेडलाईन’ दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेल्या दुर्गाडी पुलाचे काम येत्या ७ महिन्यात पूर्ण करू असा दावा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे गेल्या अडीच वर्षांच्या, म्हणजेच ३० महिन्यांच्या कालावधीत या पुलाचे केवळ ४ खांब उभारणाऱ्या एमएमआरडीएच्या या दाव्यावर कसा विश्वास ठेवायचा ? असा प्रश्न या पुलासाठी पाठपुरावा करणारे शिवसेना नेते रवी पाटील यांनी उपस्थित केला आहे.

धोकादायक पत्रीपुल पाडण्याच्या कामाला अखेर सुरुवात

कल्याणहून ठाणे किंवा मुंबईला जाण्याच्या दृष्टीने उल्हास खाडीवरील दुर्गाडी पूल अत्यंत महत्वाचा दुवा आहे. मात्र वाहनांच्या प्रचंड वाढलेल्या संख्येमूळे दुर्गामाता चौक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून ६ पदरी नवा पूल बांधण्याचे एमएमअरडीएने निश्चित केले होते. त्यानुसार ११ मार्च २०१६ रोजी संबंधित कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला. पुढील २४ महिन्यात म्हणजेच १० मार्च २०१८ पर्यंत हा पूल बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात मात्र ३० महिने उलटल्यानंतरही ४ खांब वगळता पुलाचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून ठप्प पडले आहे.


दरम्यान, हा पूल लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शिवसेना नेते रवी पाटील गेल्या वर्षभरापसून सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. ह्या १ ऑक्टोबरपासून दुर्गाडी पुलाचे काम पुन्हा सुरू झाले नाही तर सर्व शासकीय यंत्रणांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर एमएमआरडीए प्रशासनाने पत्र पाठवून तातडीने या पुलाचे काम सुरू करण्याबरोबरच ३१मे २०१९ ला पूल बांधून पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले आहे. ज्या कंत्राटदाराला ४ खांब बांधण्यासाठी ३० महिने लागले तो पुढील ७ महिन्यात हा पूल पूर्ण कसा करेल? ही शासनाने कल्याणकरांची केलेली एकप्रकारे थट्टाच असल्याचे रवी पाटील यांनी म्हटले. दुर्गाडी पुलाप्रमाणे कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणारा रिंगरूट प्रकल्पही कासवगतीने सुरू असल्याचे ते म्हणाले.

पुण्यात कालवाफुटीमुळे अजूनही वाहतूक कोंडी

कल्याणकर नागरिक सध्या वाहतूक कोंडीच्या नरकयातना भोगत आहेत. याठिकाणी ३ आमदार आणि एक खासदार असूनही दुर्गाडी पूल आणि रिंगरूटसारख्या कल्याणच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत हे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प असले, तरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये मात्र त्यांना याची उत्तरे द्यावीच लागतील, असे चिन्ह दिसू लागले आहे.

◆◆◆


पाठवा तुमच्या परिसरातील घडामोडी आणि उपक्रमांच्या वार्ता writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: