देशात लागू होणार ‘नवे शेती निर्यात धोरण’

पत्र सूचना कार्यालय,

नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर

देशात लवकरच ‘नवीन शेती निर्यात धोरण‘ (New Agriculture Export Policy) लागू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी काल दिली. ते नवी दिल्लीत आयोजित ‘बायोफेच इंडिया’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

फोटो स्रोत: पीआयबी

शेती उत्पादनाला चालना आणि मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने देशात लवकरच ‘नवे शेती निर्यात धोरण’ लागू केले जाणार आहे. अपेडा आणि भारत-जर्मनी वाणिज्य मंडळ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या सेंद्रीय कृषी उद्योग क्षेत्रातल्या जगातल्या सर्वात मोठ्या “बायोफेच इंडिया” कार्यक्रमाचे उद्‌घाटन करताना ते  काल नवी दिल्लीत बोलत होते. या धोरणाअंतर्गत ‘कृषी विशिष्‍ट विभाग’ तयार करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

राज्यात प्रथमच शासकीय सेंद्रिय धान्य खरेदी-विक्री केंद्र

बागायती उत्पादनासह भारतात सुमारे 600 मेट्रिक टन शेती उत्पादन घेतले जाते. या उत्पादनात वृद्धी करुन आणि धान्याची नासाडी कमी करुन शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याचे धोरण असल्याचे ते म्हणाले. जगाला कृषी उत्पादनांचे निर्यात करण्यावरही सरकार लक्ष देत आहे, असे त्यांनी सांगितले. देशाच्या वैविध्यपूर्ण शेती हवामान विभागामुळे सर्व प्रकारची सेंद्रीय उत्पादन घेण्याची भारताची क्षमता आहे. देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेचाही हळूहळू विस्तार होत असून सेंद्रीय उत्पादकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

देशात लवकरच ‘नवे शेती निर्यात धोरण’ लागू केले जाणार आहे.

 

अमेरिका, युरोपियन महासंघ, कॅनडा, स्विर्त्झलंड, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, न्युझीलंड आणि जपान या देशांना भारत सेंद्रीय उत्पादनांची निर्यात करतो.

तीन दिवस चालणाऱ्या ‘बायोफेच इंडिया’ या कार्यक्रमात 15 देशातले ग्राहक सहभागी होत आहेत. काजूगर, नारळ, चहा, तेल बिया यासारखी सेंद्रीय उत्पादनं यामध्ये मांडण्यात येणार आहेत. ग्राहक आणि विक्रेते यांच्यातला संवाद तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेचेही आयोजन याप्रसंगी करण्यात आले आहे.

 

◆◆◆

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: