राज्यात प्रथमच शासकीय सेंद्रिय धान्य खरेदी-विक्री केंद्र
तांदळाचे जिल्हे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी राज्यात प्रथमच सेंद्रिय धान्य खरेदी-विक्री केंद्र गोंदियात सुरू केले जाणार आहे.
गोंदिया, २२ ऑक्टोबर
तांदळाचे जिल्हे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत सेंद्रिय तांदूळ आणि धान्य खरेदी केंद्र लवकरच सुरू केले जाणार आहे. ही माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. ते जिल्ह्यातील शासकीय धान्य खरेदी केंद्र आणि राईस मिलर्सच्या बैठकीत बोलत होते.
धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया आणि भंडारा सेंद्रिय शेतीला गेल्या काही वर्षांपासून चालना मिळत आली आहे. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्याचे चांगले परिणाम जिल्ह्यांमध्ये दिसू लागले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय पध्दतीने पिकवलेल्या धानासाठी योग्य भाव मिळावा व ते विक्री करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून जिल्ह्यात सेंद्रिय धान्य खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत.
पूर्व विदर्भातील गोंदिया आणि भंडारा जिल्हे संपूर्ण महाराष्ट्रात ‘भाताचे जिल्हे’ म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राचे पूर्वेकडील प्रवेशद्वार असलेल्या एकट्या गोंदिया जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर शेतजमिनीवर धान पिकाची लागवड केली जाते. इतके विक्रमी उत्पादन असूनही इथल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मात्र हलाखीची आहे. शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ व धानाला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक स्थिती सुधारली जात नाही. यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेती तज्ज्ञ अशी ओळख असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सेंद्रीय धान्य खरेदी-विक्री केंद्राची संकल्पना मांडली होती. त्यामार्फत सेंद्रिय पद्धतीने धान लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे ‘आत्मा’च्या माध्यमातून जिल्ह्यात ५१ गट तयार करण्यात आले आहेत. सदृढ आरोग्य, जैवविविधता संवर्धन आणि पशुपक्षी संवर्धनाच्या दृष्टीने जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. दै. लोकमत
या सर्व प्रयत्नांतून दोन्ही जिल्ह्यांत विविध सकारात्मक परिणाम बघायला मिळाले. जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे शासनाने दोन्ही जिल्ह्यांत सेंद्रिय धान्य खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याचे ठरवले आहे. या केंद्रांतून शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळेल, बाजारपेठ उपलब्ध होईल आणि सेंद्रिय शेतीला अधिक चालना मिळेल हा या मागचा विचार आहे. यामुळे राज्यात प्रथमच सेंद्रिय शेतीचा मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे आणि गोंदिया हा राज्यातील पहिला सेंद्रिय जिल्हा ठरणार आहे. याविषयीची सविस्तर माहिती गिरीश बापट यांनी बैठकीत दिली.
● देशपातळीवरील सेंद्रिय शेती:
२०१६ साली सिक्कीम हे देशातील ‘पहिले सेंद्रिय राज्य’ बनले. सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास वाव दिल्यामुळे सिक्कीम राज्याचा संयुक्त राष्ट्रसंघातर्फे गौरवही करण्यात आला आहे. आरोग्याला हानिकारक असलेली, पर्यावरणपूरक, जैवसंवर्धनार्थ फायदेशीर अशी सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे विविध स्तरांवर सेंद्रिय शेती करणे ही आता गरजेची बाब झाली आहे.
◆◆◆