समाजमाध्यमांचे ‘आभासी’ जग
‘समाजमाध्यम’ (सोशल मीडिया) हे आज अनेक लोकांच्या प्रमुख गरजांपैकी एक आहे. ह्या गरजेशिवाय आपला दिवस जाणे, म्हणजे थोडं कठीणच. नाही का?
सुरुवातीला फक्त तरुण पिढीपर्यंतच (यंग जनरेशन) मर्यादित असलेले हे माध्यम आता म्हाताऱ्या-कोताऱ्यांच्याही, अर्थातच वयस्कर मंडळींच्याही जवळचे झाले आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांप्रमाणे सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा एक ‘अविभाज्य’ घटकच बनून गेला आहे.
या समाज समाजमाध्यमांतून असंख्य गोष्टी सध्य करता येतात. म्हणजे त्यांचे फायदेही खूप आहेतच. पण ज्याप्रकारे नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रकारे एखाद्या गोष्टचे फायदे असतात, तसेच तोटेही असतातच.
या समाजमाध्यमांच्या आभासी जगात आपण हरवत चाललो आहोत, पुरते गुंतत चाललो आहोत हे नक्कीच. नको त्या गोष्टी घेत चाललोत आणि गरजेच्या गोष्टी विसरत चाललोत. त्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या शारीरिक आणि मानसिक जीवनावर होत आहे, हे आपल्या लक्षात येत नाहीये. त्याचं रूपांतर मग स्वतःला त्रास करून घेण्यापासून तर दुसऱ्याला त्रास देऊन अगदी जीव देण्या-घेण्यापर्यंत जाऊन पोहचते. पण या सगळ्यांसाठी फक्त तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) आणि हे समाजमाध्यम जबाबदार आहेत असे नाही, तर त्यासाठी आपल्याही खूप चुका आहेतच.
आपणच आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यावर अवलंबून राहून त्या गोष्टीला आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनवले आहे. एखाद्या गोष्टीचा शोध जर चांगल्या कामासाठी लागला असेल, तर त्या गोष्टीचा उपयोगही त्यासाठीच व्हायला हवा. पण बघायला गेलं तर आपल्याकडून घडतं भलतच. मग तंत्रज्ञान, आंतरजाल (इंटरनेट) आणि समाजमाध्यमांना दोष देऊन काही साध्य होणार नाही.
आता मूळ मुद्दा असा की, या समाजमाध्यमांवर वावरत असताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. ती म्हणजे, आपण इथल्या गोष्टी लगेच मनावर घेतो, ज्या मनावर घेण्यासारख्याही नसतात. मग ती गोष्ट चांगली-वाईट कशीही असो. आपला संबंध असो वा नसो, आपण उगाच सर्व गोष्टी मनाला लावून घेत असतो. त्याचा मानसिक त्रास हा आपल्यालाच होतो. पण त्याचा समोरच्याला काही फरक पडत नसतो.
मुळात, सोशल मीडियाच्या बाहेर खूप मोठं जग आहे, हे आपण विसरून बसलोय आणि त्यामुळेच आपल्यावर ही परिस्थती ओढावली आहे. ‘याला जसं जबाबदार आपण, तसंच यातून बाहेर पडायलाही आपणच!’ या आभासी जगातील गोष्टी स्वतःहून आपल्या मनावर घेऊन आपण आपलेच नुकसान करून घेत आहोत. मुळात या गोष्टी गंभीरपणे घ्याव्याच का? तर याचं उत्तर आहे ‘नाही’!
कोणत्या गोष्टी गंभीरपणे घ्याव्यात आणि कोणत्या नाही हे जर आपल्याला कळायला लागले, तर सोशल मीडिया कळाले समजा आणि मगच ते वापरण्याला काहीतरी अर्थ उरतो. नाहीतर इकडच्या गोष्टी गंभीरपणे घेऊन खऱ्या आयुष्यात त्रासच जाणवतो. खरंतर इकडच्या गोष्टी इतक्या गांभीर्याने (सिरियसली) का घ्याव्यात, हाच मोठा प्रश्न आहे. कारण इकडे बहुतांश लोक हे आपल्या ओळखीचेही नसतात. मग त्या लोकांच्या गोष्टी मनावर घेऊन काय होणार आहे? त्यामुळे आपलाच राग, चिडचिड, सुख-दुःख, भावना, वाद या सगळ्या गोष्टी बाहेर येत असतात. जर आपल्याला हेच सगळं करायचे आहे, गोष्टी मनावर घ्यायच्याच आहेत, सिरीयस व्हायचंच आहे, तर ते आभासी जगात न होता आपल्या खऱ्या-खुऱ्या आयुष्यात व्हायला हवं. कारण तिथे तुमच्या भावना जपणारी, मन समजून घेणारी, तुम्हाला ओळखणारी, जीवाला जीव लावणारी, तुमच्या सवयी आणि स्वभाव जाणणारी माणसे आहेत, जी तुम्हाला या आभासी जगात खूप क्वचितच सापडतील.
आपण सोशल मीडियावर यावं, मुक्तपणे व्यक्त व्हावं, माहितीचे आदान-प्रदान करावं आणि मुख्य म्हणजे इकडच्या होणाऱ्या वादांवर लक्ष न देता दुर्लक्ष करून निघून जावं. एवढंच काय ते आभासी जग! इथे कुणी कुणाचं नसतं. कारण आज तुमच्यासोबत असलेली व्यक्ती उद्या तुमच्या बाजूने असेलच असे नाही. तसेच आज तुमच्यासाठी भांडणारी व्यक्ती उद्या तुमच्या विरुद्धही भांडू शकते.
इकडे ओळखी वाढवून त्याचा फायदा आपल्याला होईल की नाही हे सांगता येत नाही, पण खऱ्या आयुष्यात वाढवलेल्या ओळखीचा फायदा आपल्याला होईल एवढं नक्कीच. आभासी जगात निर्माण झालेली नाती फार काळ टिकतील असंही म्हणता येणार नाही, कारण इथे तुमची गरज संपली तर समोरचा तुम्हाला विसरतो पण खऱ्या आयुष्यात तसं नसतं. तिथे नाती ही जपली जातात (लागतात)!
खऱ्या आयुष्यात वाढलेले गैरसमज दुर करणं सोपं असतं, पण त्यामानाने इकडे वाढलेले गैरसमज दूर करणं कठीणच. त्यामुळे इकडच्या गोष्टी मनावर घेऊ नये आणि त्या वादातच पडू नये जेणेकरून गैरसमज होणारच नाहीत.
हे सगळं सांगण्याचा उद्देश इतकाच, की आभासी जगात आपण व्यक्त होण्यासाठी आलो असतो, तर मग आपण तेच करावं! बाकी , सर्व करण्यासाठी आपलं ‘खरं आयुष्य’ आहेच की…
लेख :- अनिकेत पाटील
patilaniket444@gmail.com
ट्विटर: @Anii_ket
(प्रस्तुत लेखावर असलेले तुमचे अभिप्राय, सूचना किंवा मत प्रतिक्रिया चौकटीत नक्की नोंदवा.)
◆◆◆
संपादन व मुद्रितकार्य: मराठी ब्रेन
आम्हाला लिहा: writeto@marathibrain.com
सोप्या भाषेत योग्य मुद्दा मांडला आहे. पण अनिकेत तुला अस नाही वाटतं का ? की दोन्ही व्यक्ती खूप वर्षांपासून या आभासी जगात ओळखत असतील तर त्या दोघांची मैत्री ही खरी होऊ शकते कारण ट्विटरवर ट्विटप् करून हेच आभासी जगातील संबंध खऱ्या जीवनात आले आहेत.