आसामचे पाणी थांबविण्यावर भूतानचे स्पष्टीकरण
ब्रेनवृत्त, २६ जून
चीन आणि नेपाळनंतर आता भूताननेही भारताविरोधात हालचाली सुरु केल्याची माहिती समोर आली होती. भूतानने आसाममधील बक्सा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारे पाणी अडवले आहे. त्यामुळे तेथील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत असल्याचे वृत्त होते. मात्र भूतानने हे वृत्त फेटाळून लावले असून, या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासंबंधी भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.
भुतानने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आसामला मिळणाऱ्या पाण्याचा प्रवाह जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी वाहिन्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाजे काम सुरू असल्याचे सांगितलं आहे. तसेच, पाण्यात साचलेल्या गाळ आणि चिखलामुळे पाण्याचा प्रवाह थांबला होता, जो आता पूर्ववत झाला आहे. या निवेदनासोबत त्यांनी काही छायाचित्रेही जाहीर केली आहेत.
भूतानच्या निवेदनानंतर आसामचे मुख्य सचिव संजय कृष्णा यांनीही निवेदन जाहीर केले आहे. ”भूतानने पाणी थांबवले नाही. ते गाळ, दगड आणि चिखलामुळे थांबले होते. भूतानला याबाबत माहितीत मिळताच त्यांनी प्रवाहातील गाळ, दगड आणि चिखल साफ करून पाण्याचा प्रवाह पूर्ववत केला, असे कृष्णा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
ब्रेनविश्लेषण | चीनची ‘फाइव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटजी’ काय आहे ?
दरम्यान, भूतानच्या नद्या १९५३ पासून आसामच्या बक्सा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भातशेतीसाठी पाणी पुरवठा करत आहेत. तर दुसरीकडे, अशा बातम्या प्रसिध्द झाल्यामुळे कर्नाटकातील काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, तर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही केंद्रशासनावर टीकेची झोड उठवली होती.