एलएसीवरून सैन्य मागे घेण्यास दोन्ही देशांचे एकमत
वृत्तसंस्था, मोल्डो
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव आणि गेल्या आठवड्यात भारत आणि चीनी सैन्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर काल दोन्ही देशाच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाली. चीनमधील चुशूल मोल्डो भागात झालेल्या या बैठकीत अखेर तणावपूर्ण भागातून दोन्ही देशाचे सैन्य मागे घेण्याच्या निर्णयावर दोन्ही देशाचे एकमत झाले. तसेच, ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे.
या बैठकीचे नेतृत्त्व १४व्या कोअरचे कमांडिंग ऑफिसर हरिंदर सिंह यांनी केले. चीनसोबत झालेली ही बैठक तब्बल ११ तास चालली. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावपूर्ण वातावरण आहे. अशातच मागील सोमवारी (ता. १५) चीन आणि भारतीय सैन्यात गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्ष झाला. ज्यात भारताचे २० जवान हुतात्मा झाले. त्यानंतर या भागातील वातावरण अधिकच चिघळले होते.
ब्रेनविश्लेषण | चीनची ‘फाइव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटजी’ काय आहे ?
दरम्यान, एलएसीवरील तणाव निवळण्यासाठी 6 जून रोजी लेफ्टनंट जनरल पदावरील लष्करी अधिकाऱ्यांमध्येही चर्चा झाली होती. त्यावेळीसुद्धा तणाव कमी करण्यावर एकमत झाले होते. दोन्ही बाजूचे सैन्य हळू-हळू मागे जात होते. पण १५ जून रोजी चीनने धोका दिला व पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ चौकी उभारण्याचा प्रत्यत्न केला. त्या रात्री झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. १९६७ नंतर प्रथमच असा हिंसक संघर्ष झाला.
हेही वाचा : आणि त्या रात्री चीनचा कमांडिंग ऑफिसर मारला गेला !
तथापि, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे दोन दिवसाच्या लडाख दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्याच्यावेळी ते गलवान खोऱ्यामध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेतील. सहा आठवडयांपासून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ तणावाची स्थिती आहे. भारत आणि चीन दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. नियंत्रण रेषेजवळील फॉरवर्ड लोकेशन्सवर जाऊन तिथे तैनात असलेल्या सैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. तसेच तेथील परिस्थितीचाही आढावा घेणार आहेत.