देशात ‘सामुदायिक रेडिओ केंद्रां’ची संख्या वाढवणार
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
देशातील दुर्गम भागात ‘कोव्हिड-१९‘विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील ‘सामुदायिक रेडिओ (Community Radio)’ केंद्रांना सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. या केंद्रांपर्यंत संपर्क अभियानांतर्गत पोहोचण्याच्या एक विशेष भाग म्हणून जवळपास 300 सामुदायिक रेडिओ केंद्रांना संबोधित करताना ते बोलत होते.
या वेळी बोलताना जावडेकर म्हणाले, सामुदायिक रेडिओ ‘परिवर्तनाचे पाईक’ आहेत. त्यामुळे शासन लवकरच अशा स्थानकांची संख्या वाढविण्याची योजना राबवणार आहे. ‘कम्युनिटी रेडिओ (CR)’ केंद्रे स्वयं-शाश्वत व्हावीत म्हणून त्यांचा जाहिरात प्रसारण कालावधी वाढविण्यासाठी शासन उत्सुक आहे. सध्या सामुदायिक रेडिओवरील जाहिरातजाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटे आहे, तर दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी तो 12 मिनिटे आहे.
जावडेकर पुढे म्हणाले की, कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू करताना 75% खर्च मंत्रालयाकडून केला जातो, जो निश्चित खर्चाचा मोठा भाग आहे. जाहिरात प्रसारणाच्या वेळेत बदल केल्यामुळे सामुदायिक रेडिओ केंद्रांना त्यांच्या परिचालन खर्चात मोठ्या प्रमाणावर मदत होईल. सामुदायिक रेडिओला सहकार्य करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय ‘भारतीय सामुदायिक रेडिओ चळवळीला समर्थन’ नावाची योजना राबवित असून, त्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. बातम्या प्रसारित करायला देण्याविषयीच्या कम्युनिटी रेडिओच्या केंद्रांच्या मुख्य मागणीवर मंत्र्यांनी विचारणा केली आहे. एफएम रेडिओ वाहिन्यांवरून ज्या प्रकारे बातम्या दिल्या जातात, त्याचप्रकारे कम्युनिटी रेडिओवर बातम्या प्रसारित करण्यासंबंधी आपण विचार करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
बनावट बातम्यांचा धोका ओळखून बातम्या प्रसारित करण्यापूर्वी स्थानिक स्रोतांच्या माध्यमातून त्या बातम्यांची सत्यासत्यता पडताळून मोलाची भूमिका बजावावी, असे आग्रही प्रतिपादन जावडेकर यांनी केले. तसेच, त्या बातम्या ‘ऑल इंडिया रेडिओ’लाही पाठवाव्या जेणेकरून सत्य पडताळणीला अधिक बळ मिळेल, असा सल्लाही त्यांनी दिला. मंत्रालयाने ‘पत्र माहिती कार्यालयां’तर्गत (पीआयबी) एक ‘सत्यासत्यता पडताळणी विभाग’, अर्थात ‘फॅक्ट चेक सेल’ तयार केला आहे आणि कम्युनिटी रेडिओ हे या फॅक्ट चेक सेलच्या भूमिकेस पूरक ठरू शकतात, असेही ते यावेळी म्हणाले.
● भारतातील सामुदायिक रेडिओ केंद्र
भारतात 290 कम्युनिटी रेडिओ केंद्र असून, त्यांतील 130 शैक्षणिक संस्थांद्वारे, 143 सामाजिक संस्थांद्वारे, तर 17 कृषी विज्ञान केंद्रांद्वारे चालविली जातात. ही कमी शक्तीची एफएम रेडिओ केंद्र असून 10-15 किलोमीटरच्या परिघात त्याचे प्रसारण ऐकता येते. तळागाळातील लोकांसाठीच्या संप्रेषणात बऱ्याचदा या केंद्रांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.