लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे नवे लष्करप्रमुख !
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ते सध्या उपलष्कर प्रमुखपदी कार्यरत आहेत. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत येत्या 31 डिसेंबर 2019 रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर 31 डिसेंबर 2019 रोजी लेफ्टनंट जनरल नरवणे लष्करप्रमुख पदाची सूत्रे हाती घेतील.
जुलै, २०१९ मध्ये उपलष्कर प्रमुखपदी नियुक्त झालेले मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे हे लवकरच देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून पदभार सांभाळायला सुरुवात करणार आहेत. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत शालेय शिक्षण पूर्ण केलेले लेफ्टनंट जनरल नरवणे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. नरवणे यांची सिख लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटच्या सातव्या बटालियनमध्ये जून 1980 मध्ये नियुक्ती झाली व सध्या ते त्यांच्या डॉक्टरेटवर काम करत आहेत.
लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती
गेल्या चार दशकांच्या त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीत त्यांनी पूर्वोत्तर भारत व जम्मू-काश्मीरमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. तसेच ‘ऑपरेशन पवन’ दरम्यान ते भारतीय शांती सेनेमध्येही कार्यरत होते. 1 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांनी लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता, तर गेल्या जुलै महिन्यात त्यांनी देशाचे उपलष्कर प्रमुखाची सूत्रे हाती घेतली.
मराठमोळे न्या. शरद बोबडे देशाचे नवे सरन्यायाधीश
● उपलष्कर प्रमुख नरवणे यांच्याबद्दल
१. मनोज नरवणे मूळचे पुण्याचे असून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) माजी विद्यार्थी आहेत. एनडीएतील प्रशिक्षणानंतर त्यांनी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीत प्रशिक्षण घेतले.
२. जून 1980 मध्ये ते शीख लाईट इन्फंट्रीमधून लष्करात दाखल झाले. लष्करातील प्रदीर्घ सेवेत त्यांनी ‘आसाम रायफल्स’चे महानिरीक्षक, जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
३. काही महिन्यांपूर्वी लष्कर प्रशिक्षण कमांडच्या प्रमुखपदावरुन कोलकातामधील पूर्व कमांडच्या प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी नेमणून करण्यात आली.
४. यावर्षी मार्च महिन्यात लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
(पीआयबी, मुंबई च्या संदर्भांसह)
◆◆◆