ग्रामीण राजकारणावरील ‘खुर्ची’ चित्रपटाचे चलपत्रक प्रसिद्ध

ब्रेनवृत्त, १६ जून

खुर्चीसाठी होणाऱ्या राजकारणावर सामना, सिंहासनपासून ते अगदी यंदाच रिलीज झालेल्या धुरळापर्यंत अनेक मराठी चित्रपट आजवर झळकले. ह्या सिनेमांनी सत्तेसाठी काहीही करणाऱ्या राजकारण्यांमुळे कुटूंबावर आणि सामान्य माणसावर होणारा परिणाम दाखवला. मात्र, ह्या राजकारणाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो, ते आता पहिल्यांदाच ‘खुर्ची’ ह्या आगामी सिनेमाव्दारे आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

‘आराध्या मोशन फिल्म’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित व स्वरूप वैशाली बाळासाहेब सावंत दिग्दर्शित ‘खुर्ची’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ह्या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन दुबाले पाटील आहेत. मोशन पोस्टरमधल्या लहान मुलाच्या दमदार आवाजाने ‘खुर्ची’ सिनेमात दिसणाऱ्या राजकीय नाट्याचा अंदाज येतोय.

“माझा बाप नेहमी म्हनतो, मानूस वयाने लहान असतो. पन स्वप्न बघायला वय नसतं. ते कोनत्या बी वयात पुर्न करू शकतो. आता खुर्ची आपलीच…” ह्या वाक्यातून खेड्यापाड्यातल्या लहान मुलांपर्यंत पोहोचलेल्या राजकारणाचे चित्रण ‘खुर्ची’मधून परिणामकारकपणे उमटणार हे नक्कीच दिसून येतंय. सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज झाले असले, तरी ह्या चित्रपटात कोण कलाकार असतील हे मात्र निर्मात्यांनी अद्याप गुलदस्त्यातच ठेवले आहे.

चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद स्वरूप वैशाली बाळासाहेब सावंत आणि केशव कल्याणकर ह्यांनी लिहीले आहेत. ‘बॅलेंस’ आणि ‘पॉस्को-307’ नंतर स्वरूपचा हा तिसरा चित्रपट आहे. स्वरूप सांगतो, “गावागावातल्या खुर्चीसाठीच्या राजकारणात मोठ्यांच्यासोबत नकळतपणे लहानही ओढले जातात. मग मोठ्यांचे राजकारणातले डावपेच कधी लहान मुलांच्या मनावर बिंबत जातात, ते त्यांनाही उमजत नाही. लहानपणीच शहकाटशहच्या ह्या खेळाची मुळं मुलांच्या मनात खोल रूजत जातात. बुध्दीबळाच्या ह्या खेळाचा परिणाम झालेल्या गावातल्या एका मुलाची ही कथा आहे.”

चित्रपटाचे निर्माते संतोष वसंत हगवणे म्हणतात, “ स्वरूपने लिहीलेली कथा मला खूप आवडली. त्यामूळे मी ह्या सिनेमाची निर्मिती करायचे ठरवले. सध्या चित्रपटाच्या संहितेवरचे काम पूर्ण झाले असून आता ऑक्टोबरपासून ह्या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात होईल. आणि एप्रिल 2021मध्ये आम्ही हा सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येऊ. ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु खुर्चीव्दारे आपल्याला पाहायला मिळणार आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: