Site icon MarathiBrain.in

प्राणवायू अभावी मृत्यू झालेल्यांची शासनाकडे माहितीच उपलब्ध नाही!

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली 


कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू (ऑक्सिजन) अभावी देशभरात मृत्यू पावलेल्यांची माहितीच उपलब्ध नसल्याचे केंद्र शासनाने काल सांगितले. देशातील कोणत्याही राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी दुसऱ्या लाटेत प्राणवायू अभावी जीव गमावलेल्या कुणाचीही माहिती शासनाकडे सादर केलेली नाही, असे केंद्रीय राज्य आरोग्यमंत्र्यांनी काल राज्यसभेत म्हटले. 

प्रातिनिधिक छायाचित्र (आयएएनएस)

“आरोग्य हा राज्य सुचीतील विषय आहे. केंद्र शासनाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूंची नोंद करण्यासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शिका दिलेल्या आहेत. त्यानुसार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश केंद्र शासनाला विविध प्रकरणांची व मृत्यूंची नोंद नियमितपणे पाठवतात. परंतु, कोणत्याही राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी विशेषकरून प्राणवायू अभावी झालेल्या मृत्यूंची माहिती शासनाकडे पाठवलेली नाही”, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यसभेत एक प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

वाचा । कोरोनामुक्त बालके परत रुग्णालयांच्या वाटेवर!

के. सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेसंदर्भात तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. या प्रश्नांमध्ये प्राणवायू अभावी झालेले मृत्यू, राज्यांची केंद्राकडे प्राणवायूची मागणी आणि प्रत्यक्ष पुरवठा तसेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्राणवायू पुरवठा संदर्भातील केंद्र शासनाच्या उपाययोजना आदींचा समावेश होता. 

हेही वाचा | जग करतोय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रवेश!

आरोग्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री भारती पवार यांनी वरील प्रश्नांना उत्तर देताना सांगितले, की केंद्र शासनाकडे कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू अभावी मृत्यू पावलेल्यांची माहितीच उपलब्ध नाही. कोणत्याही राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी याबाबत माहिती पुरवली नाही. पुढे पवार असेही म्हणाल्या, “राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश मृतकांची आकडेवारी लपवत असल्याची अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तरीही काही राज्यांनी मृतकांच्या माहितीचे सुसंगतीकरण करून संबंधित आकडेवारीत फेरबदल केले आहेत.”

दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी कोरोना विषाणू आजारामुळे झालेल्या मृत्यूंची कमी आकडेवारी नोंदवण्यासाठी राज्यांना जबाबदार धरले आहे. कोव्हिड-१९ मुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी जाणून शासनाद्वारे कमी दाखवली जात आहे, या दाव्याचे खंडन करत मांडवीय म्हणाले, “जर मृतकांची आकडेवारी हेतुपुरस्सरपणे कमी दाखवली जात असेल, तर ती राज्यांद्वारे दाखवली जात आहे. यामध्ये संघ शासनाचा काहीही संबंध नाही.”

 

Join @marathibrainin


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Exit mobile version