गरज ‘सवाष्ण-असवाष्ण भेदाभेद’ ओलांडण्याची
“एखादी असवाष्ण स्त्री तिथे पोहचली कि तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पहिल्या जाते किंवा चारचौघींमध्ये वेगळीच कुजबुज होते. एखादी स्त्री सवाष्ण नसेल, तर तिला तिथे उपस्थित राहण्याचा हक्क सुद्धा नसावा का ?”
ब्रेनसाहित्य | २२ जुलै २०२०
प्रत्येकच धर्मात अथवा समाजात काहीतरी अनिष्ट रूढी परंपरा पाळल्या जातात आणि त्या हळूहळू कालानुरूप नष्टही होतात. अशीच आतासुद्धा सुरु असलेली एक अनिष्ट रूढी म्हणजे ‘सवाष्ण – असवाष्ण भेदाभेद’. हा भेदभाव मुख्यतः स्त्रियांमध्येच आजसुद्धा पाळल्या जातो.
सर्वात आधी यांमधला फरक समजवून घेऊ. सवाष्ण म्हणजे काय? तर जिचा पती जिवंत आहे, अशा स्त्रीला मराठीत सुवासिनी किंवा ‘सवाष्ण’ असे म्हटले जाते. सवाष्ण हा शब्द विवाहित स्त्री दर्शवितो आणि त्याच्या विरोधात विधवा स्त्रीची प्रतिमा उभी करतो तो शब्द म्हणजेच ‘असवाष्ण’.
भारतीय व्यक्ती आणि त्यात सुद्धा मराठी माणूस हा अतिउत्सवप्रिय प्राणी आहे आणि यात सुद्धा फक्त महिलांना साजरे करायलाही अनेक सण आहेत. सण उत्सव साजरा केल्यामुळे लोक एकत्र येतात, आनंद साजरा करतात. पण ह्याच सणांमध्ये एका स्त्रीला चांगली वागणूक आणि दुसऱ्या स्त्रीला दुय्यम वागणूक का दिली जाते?
आता उदाहरण द्यायचेच झाले, तर हळदी कुंकू, मंगळागौर किंवा डोहाळजेवण वगैरे चा कार्यक्रमाचं. या किंवा अशा अनेक कार्यक्रमात स्त्रिया फक्त सवाष्ण स्त्रीलाच आमंत्रण देतात किंवा अशा स्त्रियांनाच तिथे आमंत्रण दिल्या जाते ज्या सवाष्ण असतात. अशावेळी एखादी असवाष्ण स्त्री तिथे पोहचली कि तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पहिल्या जाते किंवा चारचौघींमध्ये वेगळीच कुजबुज होते. एखादी स्त्री सवाष्ण नसेल, तर तिला तिथे उपस्थित राहण्याचा हक्क सुद्धा नसावा का ?
याव्यतिरिक्त इतर सुद्धा अनेक कार्यक्रमात, लग्न आणि इतर अनेक पूजाविधींमध्ये, औक्षण असो किंवा वाण देणे असो किंवा गजरा घालणे ह्या गोष्टींचा अधिकारसुद्धा असवाष्ण स्त्रीला दिला जात नाही. एखाद्या स्त्रीला आपल्या मुलांना किंवा नातेवाईक लोकांना औक्षण करायचा अधिकार असू नये का? एखादी स्त्री सवाष्ण नाही यात त्या स्त्रीचा काय दोष असतो ?
आपण स्त्रियांचे दाखले देताना राजमाता जिजाऊ, महाराणी लक्ष्मीबाई आणि महाराणी अहिल्याबाई यांचे दाखले देतो. या सर्व स्त्रिया जेवढ्या त्यांचे पती असताना शूरवीर होत्या, तेवढ्याच पती नसतानासुद्धा शूरवीर होत्या. मग जर आपण यांचे दाखले देतो, तर हा भेदभाव आजसुद्धा का पाळल्या जातो? एखाद्या व्यक्तीला फक्त तिचा सवाष्ण असण्या-नसण्यावरून आपण मान देत असतो, भलेही तिचं लोकांशी वागणूक योग्य असो वा अयोग्य .
सवाष्ण-असवाष्ण असण्याचा आणि त्या स्त्रीचा कुठेही काहीही दोष नसतो. असे असताना ही दुय्यम वागणूक २१ व्या शतकातसुद्धा का जोपासली जाते. आज स्त्रिया अंतराळात जात आहेत. साक्षी मलिक पासून सायना नेहवालपर्यंत अनेक नावे आपण खेळांध्ये घेतो. मग तरीही हा भेदभाव आपण कुठवर घेऊन चालणार?
ज्याप्रमाणे समाजात इतर अनेक अनिष्ट प्रथा समाजातून नष्ट झाल्या आणि होत आहेत, त्याप्रमाणेच सवाष्ण-असवाष्ण हा भेदभावसुद्धा नष्ट व्हायला स्त्रियांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कारण एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची आई, बहीण, सासू किंवा मैत्रीण नक्कीच असते. कालानुरूप बदल आणि परिवर्तन ही समाजाची गरज आहे, अशावेळी स्त्रियांनीच या विरोधात एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे.
लेख : प्रसाद पाचपांडे, जि. अमरावती
ट्विटर : @prasadpachpandhe
ई-मेल : prasadpachpande12@gmail.com
◆◆◆
(प्रस्तुत लेखात प्रकाशित विचार हे पूर्णतः लेखकाचे असून, मराठी ब्रेन व संपादक मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.)
Subscribe on Telegram@marathibraincom
अशीच विविधांगी माहिती, विश्लेषण, बातम्या, साहित्य आपल्या मायबोली मराठीतून थेट जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.
Subscribe on Telegram@marathibraincom