समुद्री माशांमध्ये प्लास्टिकचे अंश ; ‘टेरी’चे विशेष अभियान !

मुंबईसारख्या महानगरात वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाचा फटका समुद्री माशांनाही बसला असून, माशांमध्ये प्लास्टिकचे अंश सापडले आहेत. या समस्येला आळा घालण्यासाठी ‘ऊर्जा आणि संसाधन संस्था’ (टेरी) तर्फे विशेष अभियान राबविले जाणार आहे.

 

ब्रेनवृत्त, मुंबई 

मुंबई शहर व उपनगरातून दरदिवशी कितीतरी टन प्लास्टिक कचरा समुद्रात सोडला जातो. यामुळे पाण्याचे प्रदूषण होऊन परिणामतः प्लास्टिक कचऱ्याचे अंश माशांमध्ये आढळून आले आहेत. या गंभीर बाबीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘ऊर्जा आणि संसाधन संस्थे’मार्फत (टेरी – द एनर्जी अ‍ॅण्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट) विशेष अभियान आखण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रशिक्षण, प्रदूषण नियंत्रण कार्यशाळा, अहवाल सादरीकरण अशा विविध स्वरूपातून सागरी प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्याच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

मुंबई शहरातून दररोज निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे सागरी जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून, सागरी माशांमध्ये प्लास्टिकचे अंश सापडून आले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘टेरी’तर्फे विशेष अभियान  राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने एक विशेष परिषद सोमवारी मुंबई विद्यापीठात पार पडली. या परिषदेत मांडलेल्या अहवालानुसार, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याच्या आठ ते दहा किमी अंतरातील समुद्री माशांमध्ये शंभर मायक्रोनपेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिकचे अंश आढळून आले आहेत. तसेच, टेरीच्या या अभ्यासातून मुंबईत दररोज सुमारे ४०८.२७ टन प्लास्टिक कचरा तयार होत असल्याची माहिती समोर आली आहे.

गोव्याच्या रस्त्यांवर ‘इलेक्ट्रिक बस’ची फेरी

● आयसीएआर आणि सीआयएफई यांचा अहवाल

दुसरीकडे, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि मत्स्योत्पादन मध्यवर्ती शिक्षण संस्था, वर्सोवा (सीआयएफई) यांच्या तीन वर्षांच्या अभ्यासात मुंबई किनाऱ्यावरील समुद्री माशांमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळून आल्याचेही या परिषदेत सांगण्यात आले. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरदेखील प्लास्टिकचे सूक्ष्म कण शिल्लक राहत असून त्यांचा परिणाम समुद्री पर्यावरणावर होत असल्याचे अभ्यासातून दिसून आले. सर्वेक्षणासाठी तपासलेल्या ३०० पैकी २०० माशांमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळल्याचे यावेळी सीआयएफईच्या संशोधकांनी सांगितले.

ओझोनचा थर : पृथ्वीवरील जीवसृष्टीचा संरक्षक

प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी पद्धतीअभावी यातील बरेच प्लास्टिक, प्लास्टिकचे अंश सांडपाण्याबरोबर समुद्रात वाहून जातात. यावर नियंत्रण मिळवण्याची ठोस उपाययोजनेसाठी ‘संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या माध्यमातून ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

लवकरच दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवरही बंदी

● ‘टेरी’ चे व्यापक अभियान

सागरी माशांमध्ये प्लास्टिकचे अंश सापडून येण्याच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘टेरी’तर्फे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये पुढील दोन महिन्यांत अनेक जनजागृती कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत एकदा वापरले जाणारे प्लास्टिकचा टाळणे, प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करण्यासाठी उपाय सुचवणारे ‘रिथिंक प्लास्टिक’ हे अनुप्रयोग संस्थेतर्फे विकसित करण्यात आले आहे. स्वतःचे नाव आणि ठिकाण यामध्ये नोंदवून कोणालाही या अभियानात सहभागी होता येईल. या अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेच्या २५ हजार विद्यार्थ्यांना सहभागी केले जाणार आहे, तसेच स्वयंसेवी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्थानादेखील सामावून घेतले जाणार असल्याचे टेरीच्या पश्चिम विभागीय सहयोगी उपसंचालक डॉ. अंजली पारसनीस यांनी सांगितले.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: