देशातील महत्त्वाच्या ९१ धरणांमध्ये फक्त ७० टक्के पाणी!

देशातील महत्त्वाच्या ९१ धरणांचा जलसाठा साठवणूक क्षमतेच्या ७० टक्के शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.

 

मराठी ब्रेन

नवी दिल्ली, २८ ऑक्टोबर

देशातील महत्त्वाच्या ९१ धरणांचा जलसाठा साठवणूक क्षमतेच्या ७० टक्के शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. या धरणांच्या पाणीसाठ्याच्या पातळीत १ टक्क्यांनी घट झाली असल्याचे केंद्रीय पाणी आयोगाच्या तपासणीतून दिसून आले आहे.

देशातील ९१ महत्त्वाच्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये १ टक्क्याने घट झाली आहे.

देशातील महत्त्वाच्या ९१ धरणांमध्ये ११२.६७ अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते ७० टक्के इतकेच आहे, अशी माहिती शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे. ही आकडेवारी गेल्या आठवड्यातील, म्हणजेच २५ ऑक्टोबर पर्यंतची आहे. 

देशातील या ९१ मोठ्या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता १६१.९९३ अब्ज घनमीटर इतकी आहे. या ९१ पैकी ३७ जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत. म्हणून हे जास्त महत्त्वाचे ठरतात.

केंद्राने जाहीर केलेल्या माहितीनुसार या ९१ धरणांपैकी पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून यांमध्ये २७ मोठ्या धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता ३१.२६ अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या १७.२१ अब्ज घनमीटर एवढेच पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा धरणांच्या साठवणूक क्षमतेच्या ५५ टक्केच आहे.

महाराष्ट्र व गुजरात सोडले तर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला जलसाठा उपलब्ध आहे. तर झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील जलसाठ्यांची पातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे.

 

◆◆◆

One thought on “देशातील महत्त्वाच्या ९१ धरणांमध्ये फक्त ७० टक्के पाणी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: