‘मास्क्ड आधार’ म्हणजे काय?

मराठीब्रेन वृत्त,

२० ऑक्टोबर २०१८

आधार ओळखपत्राला अधिक सुरक्षित करण्याचे नवे पाऊल ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’ने (युआयडीएआय) उचलले आहे. ‘ई-आधार’ला अधिक सुरक्षित करण्याची सेवा आधार प्राधिकरणाने सुरू केली आहे. या सेवेच्या अंतर्गत आधार कार्ड वापरकर्ते आपले कार्ड डाउनलोड करताना त्यांचा आधार क्रमांक लपवू शकणार आहेत. या ई-आधार कार्डला ‘मास्क्ड आधार’ (Masked Aadhaar) असे नाव देण्यात आले आहे. ज्या ग्राहकांना आपले आधार क्रमांक इतरांना द्यायचे किंवा सांगायचे नसते, अशांसाठी हे कार्ड मदतीचे ठरणार आहे.

Image Source: onlinesahayata.in

 

हे ‘मास्क्ड आधार’ काय आहे? हे जाणून घेण्याआधी ‘ई-आधार‘ काय आहे, हे माहिती असणे गरजेचे आहे.

● ई-आधार (eAadhaar- Electronic Aadhaar)

१) इलेक्ट्रॉनिक आधार हे आपल्याकडे भौतिक रुपात (फिजिकली) उपलब्ध असलेल्या आधारचे परवलीच्या शब्दाने (पासवर्ड) युक्त असलेले रूप आहे.

२) भौतिक रूपातील आधार आणि ई-आधार यांमध्ये काहीही फरक नसून, सर्व सेवांसाठी या दोघांचा सारखाच वापर करता येतो. यावर ‘युआयडीएआय’ची डिजिटल स्वाक्षरी असते.

३) हे ई-आधार आपल्याला आधार क्रमांक, आभासी ओळखपत्र (व्हर्चुअल आयडी) किंवा नोंदणी क्रमांकाच्या (इंरॉलमेंट) साहाय्याने www.uidai.gov.in या संकेतस्थळावर डाउनलोड करता येते.

या ई-आधारचे अधिक सुरक्षित स्वरूप म्हणजे ‘मास्क्ड आधार’ हे आहे. यामध्ये आधार वापरकर्त्यांच्या १२ अंकी आधार क्रमांकातील सुरवातीचे ८ अंक हे लपलेले असतील. उर्वरित ४ अंक, क्यूआर कोड, फोटो आणि उर्वरित गोष्टी कार्डवर दिसणार आहेत.

 

हेही वाचा : आधारमुळे दूरध्वनी क्रमांक बंद पडणार नाही!

 

● ‘मास्क्ड आधार’ कसे प्राप्त कराल?

१) सर्वप्रथम आधारचे अधिकृत संकेतस्थळ uidai.gov.in वर जा.

२) त्यानंतर आधार आधार इंरॉलमेंट (Aadhaar Enrollment) विभागात जाऊन ‘Download Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.

३) यानंतर तुम्हाला साधारण ई-आधार किंवा ‘मास्क्ड आधार’ असे दोन पर्याय दिसतील. त्यातून ‘मास्क्ड आधार’ हा पर्याय निवडा.

४) आता हे मुखवट्याचे आधार मिळवून घेण्यासाठी तुमच्याकडे असलेला आधार क्रमांक, नोंदणी क्रमांक किंवा व्हर्चुअल आयडी त्यात नमूद करा.

५) यानंतर तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल क्रमांक आणि त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी नमूद करण्यासाठी विचारले जाईल. ही प्रक्रिया टप्प्याने पूर्ण करा. याने तुम्हाला ‘मास्क्ड आधार’ प्राप्त होईल.

 

◆◆◆

 

पाठवा तुमचे लिखाण, तुमच्या परिसरातील घडामोडी writeto@marathibrain.com वर. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: