आजचा स्वतंत्र भारत
यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून एकाहत्तर वर्षे होत आहेत. आमच्या लहानपणी साधारण पन्नासपंचावन्न वर्षापूर्वीचे दिवस अजून आठवतात.१५ अॉगष्ट दिवशी भल्या पहाटे उठून स्नान वगैरे उरकून आदले दिवशीच तांब्यात विस्तव घालून इस्त्री केलेली खाकी हाफ चड्डी व पांढरा शर्ट व डोक्यावर पांढरी टोपी घालून बरोबर सहाच्या ठोक्याला शाळेत हजर होऊन गावभर मिरवणाऱ्या प्रभात फेरीत सामिल होण्यासाठी तयार असायचो.दोन दोन पोरे एकमेकाचे हातात हात घेऊन शिस्तीत रांगेत “भारत देश कोणाचा -३६ कोटी लोकांचा”, “एकावर एक अकरा – गांधी टोपी वापरा”, भारतमाता की- जय” चा उद्घघोष करत शेवटी शाळेच्या प्रांगणात झेंडा वंदन करून घरी यायचो.
आता परिस्थिती बदलली.नाही ही शाळेचा गणवेश खाकी ना गांधी टोपी. प्रत्येक शाळा आपल्या मर्जीनुसार रंगीबेरंगी गणवेश,इतकंच काय जिल्हापरिषदेच्या शाळेनं पण खाकीला तिलांजली दिली. तिथंच एकात्मतेची भावना कमी होण्यास सुरूवात झाली अन भरीत भर शाळेत नाव घालतानाच जातीचा रकाना भरल्यानं आताचा जाती जातीत जो क्षोभ होतोय,प्रसंगी या जातीपाई जीव देणं/घेणं होतोय त्याची नांदी खरं तर या शाळेत उल्लेखिलेल्या या जातीच्या रकान्यामुळेच. भारत नुसता शरीरानं फुगतोय, स्वातंत्र्यापूर्वीच्या लोकसंखेत जवळपास शंभर कोटीची भर पडलीय. पण भारतीयात जातीच्या भिंतीमुळं एकमेकात सलोखा राहीला नाही. आमच्यावर “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत” असं जबरदस्तीन म्हणवून घ्यायची वेळ आली आहे. ते हृदयातूनच असलं पाहिजे. स्वातंत्र्यासाठी सर्व जातींना एकत्र करून एकत्र लढा देऊन इंग्रजाच्या पाशातून मुक्त करण्याचं काम आमच्या स्वातंत्र्य विरांनी केलं अन दूर्दैव असं की आता महत्प्रयासाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग स्वैराचारानं घेण्याकामी कांही स्वार्थी राजकीय मंडळी पुनश्च जातीजातीत तेढ उत्पन्न करून,स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत.
अशा या आपलपोटी भावनेनं आमच्या भारतमातेला अन ज्यांच्या बलीदानानं या गोऱ्यांच्या तावडीतून सोडवणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या आत्म्यांना काय वाटत असेल, हि कल्पना पण करवत नाही.
भारतात ब्रिटीशांनी पाऊल ठेवण्याअगोदर जगातला सर्वात श्रीमंत देश म्हणून ख्याती असणारा देश, इंग्रजांनी अगदी आमची हाडे हळूहळू ठिसूळ व्हावीत म्हणून जर्मन वा अल्युमिनियम ची भांडी आणली,आम्ही ही अज्ञानान ती कधीच स्विकारली तद्वतच जातीजातीत तेढ पसरवणारी राजकीय मंडळी इथून “जात”नाहीत तोवर खऱ्या स्वातंत्र्याचा उपभोग आम्ही घेऊ शकणार नाहीत, हेही तितकेच खरे !
मला एका अज्ञात कविच्या या ओळी आठवतात,
पुन्हा जावे शाळेत
पुन्हा ती दिसावी ….
भले लागू दे शिकाया
लसावि, मसावि….
जय हिंद ! वंदे मातरम !!
सुरेश जोशीकाका (Twitter: @joshisuresh285)
१५ अॉगष्ट २०१८