पहिलाच विमान प्रवास
स्मितहास्य देऊन अदबीने “हॅलो!! सर…” म्हणणारी एक सुंदर मुलगी दिसली. तिने वाऱ्याच्या वेगाने एक इंग्रजी वाक्य झाडले, ते माझ्या डोक्यावरून गेले आणि ते तिला समजायला एक क्षणसुद्धा लागला नाही. तिने पुन्हा एकदा विचारले “May I help you sir??”
२१ ऑक्टोबर, २०१८
जसे ठराविक मित्रांना समजले की प्रसाद विमानात बसणार, तोच मित्रांचे सल्ले चालू झाले. खिडकीतून वाकून पाहू नको, विमान चहा प्यायला थांबल्यावर पटकन येऊन बस, म्हातारं माणूस आलं तर त्यांना बसायला जागा दे! इत्यादी, इत्यादी… यात मी फक्त चातक पक्षी जसा पावसाची तळमळीने वाट पाहत असतो, तसा २७ सप्टेंबरचा सूर्य कधी एकदाचा अंधाराची चादर ओढून हळूच डोंगर कपाऱ्यातून पाहतो असे झाले होते. आणि ती रात्र उद्याच्या विमान प्रवास स्वप्नात जणू क्षणात सर येऊन निघून जाते, तशी निघून गेली.
शेवटी जणू एक तप पूर्ण करून एखादा संन्यासी जसा परत येतो, तसा तो दिवस माझ्या समोर आला. अगदी नवचैतन्य आणि नवा अनुभव देण्यासाठी सोनेरी किरणांची पिवळसर मंद झालर पांघरून माझ्या समोर नवानुभवरुपी सकाळ उजाडली. मी अधाशासारखा बॅग आवरून पुण्याच्या दिशेने निघालो. तिथंपर्यंतचा प्रवास हा ६ तासांचा आहे, हे ज्ञात असूनही बसने जाताना उगीच दर १५ मिनिटांनी मी गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर डोकावून पाहत होतो. आणि ह्याच द्विधा मनःस्थितीत मी एकदाचा विमानतळाच्या नजीक पोहचलो आणि विमानाचा तो रुद्र आवाज ऐकायला येणे चालू झाले.
इथंपर्यंत ठिक होतं, पण खरी कसोटी आत्ता होती आणि ती मला गणितीय प्रमेयाप्रमाणे अवघड जाणार होती. तशी ही खूनगाट मी मनाशी बांधूनच आलो होतो आणि तसेच काही आत प्रवेश करताना माझ्याबरोबर झालेही. जेव्हा मी आत जाणार त्यावेळी मी सर्वांचे १५ मिनिट निरीक्षण केले व मला ओझरता अंदाज आला, की मला काय साध्य करायचेय आणि त्यास कोणती सिद्धता वापरावी लागेल. मी त्या दृष्टीने पाऊल उचलले आणि टेक्नॉलॉजीचा माणूस असल्याची थोडी लाजही वाटली, कारण सर्वजण आपले तिकीट मोबाईलवर दाखवत होते आणि मी ते प्रिंट करून आणले होते. असो…
त्या खजिल अवस्थेतच मी कसाबसा आत प्रवेश केला. मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मी बोर्डिंग पासच्या शोधत असताना मला वाळवंटात तहानेने व्याकुळ वाटसरूला पाण्याचा झरा दिसल्यावर जो परमोच्च आनंद होतो, तसा मला झाला. तिथे मी एक साधारण उंचीतील उभा चेहरा, सुढेल-आकर्षक बांधा, डोळ्यांत निषेधाचे प्रतिक असलेल्या काळ्या रंगाचा सौंदर्याविष्कार केलेली, लांब लहरी केसांना जणू काळ्या पाण्याची शिक्षा दिल्याप्रमाणे त्यांना निर्दयीपणे एक विशिष्ट बांधीमध्ये अगदी सहज बांधून ठेवलेली, गालावरती शीत रंग संगतीतील गुलाबी रंगाची हलकी परत असलेली आणि स्मितहास्य देऊन अदबीने “हॅलो!! सर…” म्हणणारी एक सुंदर मुलगी दिसली. तिने वाऱ्याच्या वेगाने एक इंग्रजी वाक्य झाडले, ते माझ्या डोक्यावरून गेले आणि ते तिला समजायला एक क्षणसुद्धा लागला नाही. तिने पुन्हा एकदा विचारले “May I help you sir??” आणि मी भांबावल्या अवस्थेत “हो ! हो!” उत्तरलो. लगेचचं पुन्हा मीही इंग्रजीत उत्तरलो “Yeah! I need help, will you help me to get Boarding pass please??” आणि ती सुंदर मुलगी लगेच ‘होय!’ म्हणाली आणि तिने काही क्षणातच तो पास मला दिला. म्हणाली, ‘पहिलीच वेळ का?’ हे ऐकून मी जरा गोंधळलोच आणि तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. मी काही बोलायच्या आतच ती म्हणाली, ‘Your Flight is at gate number 2.’ आणि मला अर्ध्यावरच सोडून निघून गेली. मग काय, नंतर ‘गेट नंबर २’ शोधताना मी असंख्य सहजासहजी न पाहिलेल्या गोष्टी पहिल्या आणि ‘स्टॅण्डर्ड’पणा काय असतो हे समजले.
त्यानंतर २ तासाच्या प्रतीक्षेत मी फक्त काचेतून विमानाचे उड्डाण आणि उतरणे हेच पाहत होतो. तेवढ्यात एक हँडसम व्यक्ती समोर आली आणि अदबीने विचारू लागली, ‘Is here any one for Jaipur 6E-007?’ हे ऐकताच मी पटकन उठलो आणि आता विमानात बसायला मिळणार म्हणून रांगेत जाऊन पटकन उभा राहिलो. लगेच विमानाच्या दिशेने धावलो आणि पटकन एक ‘स्वयं-प्रतिमा‘ (Selfie) काढली आणि बसायला धावलो. त्यांनंतर विमानाच्या दरवाज्यावर जे काही झाले, त्याने माझा सर्व थकवाच निघून गेला. कारण तेथील मुलगी हातात हात मिळवून, हलक्या आवाजात ‘Welcome Sir!’ असे बोलून ‘Have a seat’ बोलली. नशिबाने पहिल्या प्रवासातच विंडोसीट मिळाली. मग काय, दुधातच साखर आणि मी खुश!
थोडाच वेळात त्या हवाई सुंदरीने सूचना चालू केल्या, की बेल्ट कसा लावावा, आपत्कालीन खिडक्या किती आणि कोठे आहेत, ऑक्सिजन मास्क कसे लावावे आणि बरेच काही. थोड्या वेळाने विमानाने उड्डाण घ्यायला सुरुवात केली, तास तास डोक्यावर ताण येऊ लागला आणि भीतीने छातीचे ठोके वाढू लागले, चक्कर आल्यासारखे झाले. तोच शेजारील एका मुलीने मला एक चॉकलेट खायला दिले आणि म्हणाली, ‘ये खाओ आपको अच्छा लगेगा.’ मी पटकन ते खाऊन टाकले आणि बरे वाटायला लागले, तोपर्यंत विमान हवेत बऱ्याच उंचीवर स्थिरावले होते. पुण्याचा आकाशातून रात्रीचा नजारा अगदी जमिनीवर झोपून दिसणाऱ्या आकाशाप्रमाणे रंगेबिरंगी प्रकाशाने उजळून दिसत होता.
… आणि अशा विविध गोष्टींचा पाठलाग करत केव्हा जयपूर आले ते समजलेच नाही आणि विमान प्रवासाचा शेवटही झाला.
लेख : प्रा. प्रसाद गायकवाड (इंदापूर)
भ्रमणध्वनी: ९९६०४१५४६७
◆◆◆
(प्रस्तुत लेख हा पूर्णतः लेखकाच्या हक्काधीन आहे. इथे प्रकाशित होणाऱ्या विचार किंवा मतांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)
तुमच्या प्रतिक्रिया लेखाखाली दिलेल्या प्रतिक्रिया बॉक्समध्ये नक्की कळवा.
तुमचे लिखाण किंवा अनुभव इथे प्रकाशित करण्यासाठी पाठवा writeto@marathibrain.com वर.