‘पाणी वाचवा, व्हिडीओ बनवा आणि बक्षीस मिळवा’ स्पर्धा’
केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाची जलसंवर्धनासाठी “जल बचाओ, व्हिडिओ बनाओ, पुरस्कार पाओ” स्पर्धा घोषित, 25 हजार रुपयांच्या पुरस्काराची घोषणा
जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात जन सहभाग वाढावा, या हेतूने केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाने “जल बचाओ,व्हिडिओ बनाओ, पुरस्कार पाओ” ही स्पर्धा घोषित केली आहे.
“My Gov” पोर्टलवरुन काल ही स्पर्धा घोषित करण्यात आली. ही स्पर्धा पंधरवड्याची असेल आणि प्रत्येक पंधरवड्यात तीन विजेते निवडले जातील. या स्पर्धेत कोणीही भारतीय नागरिक आपला व्हिडिओ युट्युबरवर टाकू शकेल आणि त्या व्हिडिओची लिंक माय गोव्हच्या www.mygov.in या पानावरही टाकू शकेल.
व्हिडिओ निवडीचे निकष:-
व्हिडिओतील सर्जनशीलता, खरेपणा, विषयाची मांडणी, तांत्रिक बाजू, गुणवत्ता या सर्व निकषांवर स्पर्धकांचे व्हिडिओ तपासले जातील. त्यानुसार सर्वोत्कृष्ट तीन व्हिडिओंना अनुक्रमे 25 हजार , 15 हजार आणि 10 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
व्हिडिओसाठीचे नियम:-
जल व्यवस्थापन, जल संवर्धन, जलस्रोत विकास, पाण्याचा जास्तीत जास्त वापर अशा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कामाचे व्हिडिओ पाठवावेत, असे आवाहन जलसंपदा मंत्रालयाने केले आहे. या क्षेत्रातल्या नव्या जाहिराती/कल्पनांच्या व्हिडिओचेही स्वागत असेल. व्हिडिओचा कालावधी किमान 2 मिनीटे ते कमाल 10 मिनीटे असावा. व्हिडिओ इंग्रजी, हिंदी किंवा कुठल्याही प्रादेशिक भाषेतला असू शकेल. मात्र व्हिडीओ बनवताना, 1957 चा स्वामीत्व हक्क कायदा किंवा बौद्धिक संपदा कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली जावी.
स्त्रोत:- पत्र सूचना कार्यालय, मुंबई