लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदलला
जगप्रसिध्द लोणार सरोवरातील पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांत बदलला आहे. सरोवरातील पाण्याचा लालसर-गुलाबी झाल्याने परिसरातही हा विषय चर्चेचा झाला आहे. पाण्याचा रंग अचानक का बदलला याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. अनेक अभ्यासकांनी यावर संशोधनाची गरज असल्याचे म्हटले आहे.
ब्रेनवृत्त | बुलढाणा
बुलढाण्यापासून काही अंतरावर असलेल्या जगप्रसिध्द लोणार सरोवरातील पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांत बदलला आहे. सरोवरातील पाण्याचा लालसर-गुलाबी झाल्याने परिसरातही हा विषय चर्चेचा झाला आहे. पाण्याचा रंग अचानक का बदलला याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. अनेक अभ्यासकांनी यावर संशोधनाची गरज असल्याचे म्हटले आहे, तर वातावरणातील बदल, सरोवरात पाण्याची कमी झालेली पातळी, या प्रकारातूनही रंग बदलल्याचा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी झालेल्या उल्कापिंडाच्या धडकेनंतर याठिकाणी सरोवराची निर्मिती झाली. खाऱ्या पाण्याचे हे सरोवर जगातील आश्चार्य म्हणून ओळखले जाते. उल्कापाताने निर्माण झालेले बेसाल्ट खडकाचे हे सरोवर आशिया खंडातील पहिले आणि जगातील तिसरे सरोवर आहे. या सरोवरात असलेले पाणी मूळात क्षारयुक्त असले, तरी सरोवरात क्षारयुक्त पाणी आणि गोड पाणी असे दोन प्रवाह आहेत. तसेच, लोणार सरोवरात हॅलोबॅक्टेरिया आणि ड्युनोलिला सलीना नावाच्या कवका-बुरशीची खाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाल्यामुळे पाण्याचा रंग लाल झाला असावा, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
लोणार सरोवर परिसरात असलेल्या मातीमध्ये चुंबकीय गुणधर्म आहेत. तसेच जागतिक तापमानवाढ (Global Warming) आणि वातावरणातील बदल (Climate Change), सरोवरात पाण्याची कमी झालेली पातळी, अशा अनेक प्रकारातूनही रंग बदलल्याचा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला आहे. तापमान वाढ व पर्यावरणातील बदलाचे परिणाम लोणार सरोवरावर होत असल्याची चर्चा अभ्यासकांमध्ये नेहमी असते. या सरोवराचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील संशोधक नेहमी येतात. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व टाळेबंदीमुळे मागील तीन महिन्यांत लोणार सरोवर परिसरात कोणीही अभ्यासक फिरकलेले नाहीत.
दरम्यान, गेल्या आठवड्यात मान्सून पूर्व पावसानंतर सरोवरातील पाणी निळे व हिरवे दिसत होते. ज्यात आता पुन्हा बदल झाला असून आता हे पाणी गडद गुलाबी व लालसर झाल्याचे दिसत आहे. स्थानिक नागरिकांनी याचे छायाचित्र व चित्रफित काढून समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याने पाण्याचा बदलेला रंग पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. मात्र, रंग बदल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
त्यामुळे, सरोवरातील पाण्यात झालेले बदल अभ्यासले जाणार असून, संशोधन करणाऱ्या संस्थांकडे पाण्याचे नमुने पाठविण्यात येणार आहेत. त्यावर संशोधन झाल्यावर अधिकृत निष्कर्ष काढता येईल, अशी माहिती लोणार सरोवर विकास व संवर्धन समितीचे सदस्य प्रा.गजानन खरात यांनी दिली आहे.
सर्वांत कठोर वस्तू म्हणून ‘हिरा’ म्हणजे थट्टाच!
तर नासाच्या मते, बेसाल्ट खडकातील लोणार सरोवर हे चंद्राच्या पृष्ठभागावरील खड्ड्यांप्रमाणेच आहे अणि येथील दगडांचे नमूने हेसुद्धा चंद्राच्या पहिल्या मानवी अभियानामध्ये सापडलेल्या दगडांच्या नमुन्यांसारखे आहेत. शिवाय, तलावात आढळलेले जिवाणू हे मंगळावर नुकत्याच आढळलेल्या जिवाणूंसदृश्यही आहेत.