बालसंस्काराच्या नावावर धर्मप्रसार करणाऱ्या पादरीला अटक
‘बालसंस्कारवर्गा’च्या नावावर शाळकरी मुलांना विविध आमिष दाखवून आयोग्यरित्या धर्मप्रसार करणाऱ्या कल्याणमधील ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा डाव हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उधळून लावला आहे. संबंधित पादरीला अटक करण्यात आली आहे.
मराठी ब्रेन, प्रतिनिधी
कल्याण, २२ नोव्हेंबर
कल्याण पूर्व येथील प्राथमिक शाळेतील लहान मुलांमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारकांद्वारे आयोग्यरित्या धर्माचा प्रसार करत असल्याचे प्रकरण घडले आहे. स्थानिक लोकांनी व हिंदुत्ववादी संघटनांनी हा गैरप्रकार उघडकीस आणून पोलिसांना संबंधित पादरीला अटक करण्यास बाध्य केले आहे.
९ नोव्हेंबरला दुपारी १ च्या सुमारास कल्याण पूर्वेतील गायत्री प्राथमिक विद्यालयाच्या बाहेर ‘जेरुसलेम चर्च’च्या नावाने फलक लावून बालसंस्कारवर्गाचा काहीतरी कार्यक्रम चालू असल्याची माहिती कल्याण पूर्वचे शिवसेना पदाधिकारी आणि सह्याद्री प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते सुभाष मते यांना मिळाली. त्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सह्याद्री प्रतिष्ठान आणि भाजप या संघटना आणि पक्षाचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्रित येऊन शिबीर चालू असलेल्या शाळेतील वर्गात गेले असता, हिंदु मुले आणि ख्रिस्ती प्रचारक महिला तेथे उपस्थित होत्या. हिंदू मुलांसाठी चित्रकला, संगीत, नृत्य, गायन अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून बक्षिसांचे आमिष दाखवून मुलांच्या मनात हिंदू धर्माविषयी द्वेष निर्माण करून ख्रिस्ती पंथ सर्वश्रेष्ठ असल्याचे भासवत असल्याचे काही पुरावे तेथे मिळाले.
शाळेतील हा प्रकार फक्त ख्रिस्ती धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे संगण्यापर्यंतच मर्यादित नव्हता. हिंदूंना पवित्र असलेल्या ‘ॐ’च्या प्रतिकावर ‘फुली’ मारून ख्रिस्ती पंथाचे प्रतीक असलेल्या क्रॉसवर ‘बरोबर’ अशी खूण असलेली चित्रे मुलांकडून काढून घेतल्याचे आढळले. तसेच ‘मोदी सरकार चोर आहे’ या आशयाचे एक चित्रही त्यात होते. या सर्व कृत्यांचा मुलांच्या मनावर इतका परिणाम झाला होता, की मुले घरी परतत असताना ख्रिस्ती धर्मसंबंधीचे नारे लावत होते, तर काही मुलांच्या मनात भारतीय शासनाविरोधी विचारही पेरले गेले होते.
हिंदु धर्मातील श्रद्धास्थानांचा अवमान करणारे फलक मोठ्या संख्येने शिबिराच्या ठिकाणी लावल्याचे दिसले. तसेच नृत्य, गायन, संगीत अशा स्पर्धा आयोजित करून त्यात केवळ ख्रिस्ती पंथ आणि जीझसचे गोडवे गाणारी गाणी लावण्यात आली होती. मुलांकडूनही तसेच बोलवून घेतल्याचे पालकांनी सांगितले. शिबिरातील मुलांना बायबलच्या प्रतीही दिल्याचे काहींनी सांगितले. ‘जिझसला प्रार्थना केल्याने अभ्यास चांगला होऊन परीक्षेत उत्तम गुण मिळतील’, असे तेथील हिंदु मुलांच्या मनावर बिंबवण्यात आले आणि तशी प्रार्थनाही त्यांच्याकडून बोलून घेतल्याचे एका मुलाने सांगितले.
अशाप्रकारे हिंदु मुलांमध्ये दिवाळीच्या सुट्टीतील तथाकथित ‘बालसंस्कारवर्गाच्या’ माध्यमातून ख्रिस्ती पंथाचा प्रचार, प्रसार केला जात असल्याचे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लक्षात आल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी धर्मांतराचा कट तिथल्या तिथे उधळून लावला आहे.
या प्रकरणाच्या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्ते तक्रार नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले. पण पोलिसांनी तक्रार नोंद करून घेण्यास टाळाटाळ करून ‘हा विषय आपण शांतता समितीच्या माध्यमातून सोडवू’, असे सांगितले. नंतर हिंदुत्ववाद्यांचा जमाव मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात येण्यास प्रारंभ झाला आणि भाजपच्या स्थानिक राजकीय नेत्यांच्या दबावानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुभाष मते व सहकाऱ्यांच्या तक्रारीवरून ‘भारतीय दंड विधान २९५(अ)’ अंतर्गत कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून घेण्यात आली. या कलमा आधारे अयोग्य मार्गाने धर्मप्रसार करणाऱ्या पादरीला पोलिसांद्वारे अटक करण्यात आली आहे.
◆◆◆