भारतासह आठ देशांना इराणकडून कच्चे तेल खरेदीची मुभा!
अमेरिकेने इराणवर तेल निर्यातीचे नवे निर्बंध लागू केले आहेत. पण भारतासह चीन, ग्रीस, इटली, तैवान, जपान, तुर्की आणि दक्षिण कोरिया या देशांना मात्र इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची सवलत देण्यात आली आहे.
एएनआय
वॉशिंग्टन, ६ नोव्हेंबर
तेल व्यापाराच्या मुद्यावरून इराणच्या विरोधात अमेरिकेने नवे निर्बंध घातले असले, तरी काल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्बंधांपासून नऊ देशांना दूर ठेवले आहे. यामुळे भारतासह इतर आठ देशांना इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची सवलत देण्यात आली आहे.
अमेरिकेने इराणवर तेल निर्यातीचे नवे निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध काल नव्याने लागू करण्यात आले. इराणची संपूर्ण कोंडी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बँकिंग, एनर्जी आणि शिपिंग उद्योगावर निर्बंध लावले आहेत. यामुळे इतर ‘इराण तेल खरेदी करार’बद्ध देशांना इराणकडून कच्चे तेल आयात करता येणार नाही. दरम्यान, यास अपवाद म्हणून भारतासह चीन, ग्रीस, इटली, तैवान, जपान, तुर्की आणि दक्षिण कोरिया या देशांना मात्र इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची सवलत देण्यात आली आहे.
US to exempt China, India, Japan from Iran oil sanctions: US Secretary of State Mike Pompeo pic.twitter.com/S82srQgwtQ
— ANI (@ANI) November 5, 2018
अमेरिकेने इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी आठ देशांना दिलेली ही सवलत तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेची परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. प्रतिबंधांनंतर जगातील २० देशांनी इराणकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद केले आहे. यामुळे इराणच्या तेल खरेदीत १० लक्ष बॅरल प्रतिदिन कमतरता झाली असल्याचेही माइक पॉम्पिओ यांनी सांगितले.
दरम्यान, अमेरिकेच्या या निर्णयानंतर इराणकडून प्रत्युत्तरही देण्यात आले आहे. अमेरिकेच्या अशा क्रूर निर्णयांना आमचा विरोध आहे. अमेरिका कच्चे तेल निर्यातीवर कितीही निर्बंध आणण्याचा प्रयत्न करत असला, तरी इराणकडून कच्च्या तेलाची निर्यात सुरूच राहणार असल्याचे, इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, ‘अमेरिकेचे असे कठोर निर्बंध इराणची तेल निर्यात थांबवू शकत नाही.’
Iran says US "cruel" sanctions cannot stop crude oil exports. https://t.co/cSm6LpnX68 #IranSanctions pic.twitter.com/YOE0MJndNp
— Global Times (@globaltimesnews) November 6, 2018
याआधी अमेरिकी प्रशासनाने इराणकडून तेल खरेदी पूर्णत: थांबविण्याचे निर्देश जगभरातील देशांना दिले होते, पण इराणकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या भारतासारख्या काही देशांनी याला आक्षेप घेतला होता. त्या कारणाने ही तात्पुरती सवलत दिली गेली असावी असा अंदाज आहे. ही सवलत कधीपर्यंत असेल हे अजून स्पष्टपणे कळू शकलेले नाही.
◆◆◆