सीमावादातील मध्यस्थिंनी ताण वाढविणारी कृती टाळावी : संयुक्त राष्ट्र

ब्रेनवृत्त, २७ मे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आश्चर्यकारकरित्या भारत-चीन सीमावादात मध्यस्थीची तयारी दाखविली आहे. “दोन्ही देशांमध्ये समेट घडवण्याची अमेरिकेची इच्छा असून आम्ही त्यासाठी तयार आहोत. दोन्ही देशांना याबद्दल कळवले आहे.” असे टि्वट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी लडाखमध्ये सुरु असलेल्या भारत-चीन सीमावादात मध्यस्थीची तयारी दाखवली.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

तर अमेरिकेच्या मध्यस्थी करण्याच्या भूमिकेवर आता संयुक्त राष्ट्राने आपली प्रतिक्रिया दिली आहे. “कोणी मध्यस्थी करावी, हे ते दोन देशच ठरवू शकतात. याबाबत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस सांगू शकत नाहीत, पण यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी तणाव वाढेल अशी कुठलीही कृती टाळावी,’’ अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफेन दुजारिक यांनी दिली.

दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका चीनच्या बाबतीत अधिकच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच चीनी सैन्याच्या भारतीय हद्दीतील घुसखोरीमुळे अमेरिका भारताच्या बाजूने उभी आहे. यापूर्वीही अमेरिकेने चीनला भारताच्या हद्दीत घुसखोरी न करण्याबाबत इशारा दिला होता. तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनी सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिल्यानंतर अमेरिकेने यावेळी थेट मध्यस्थीची भूमिका घेत दोन्ही देशांमध्ये समेत घडविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तर दुसरीकडे भारत व चीन यांच्यात सीमेवर तणावाची स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने स्पष्टीकरण दिले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, ‘भारतालगत सीमेवर परिस्थिती स्थिर व नियंत्रणात असून दोन्ही देशात संवाद व सल्लामसलतीच्या मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत.

तसेच, दोन्ही देशातील सीमा प्रश्नाशी निगडित चीनची भूमिका सातत्यपूर्ण व स्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात दोनदा अनौपचारिक चर्चा झाल्या होत्या. त्यावेळी सीमेवर शांतता निर्माण करण्यासाठी विश्वासवर्धक उपायांवर भर देण्यात आला होता. तेव्हा दोन्ही नेत्यात जे मतैक्य झाले त्या दिशेनेच आमची वाटचाल सुरू आहे. असेही लीजीयान यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: