राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जाहीर
मराठीब्रेन वृत्त
मुंबई, २३ फेब्रुवारी
शासकीय कर्मचाऱ्यांना घोषित करण्यात आलेले सातवा वेतन आयोग राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लागू होणार असल्याचे काल राज्य शासनाने जाहीर केले आहे.
राज्यातील अनुदानित खाजगी शाळांतील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन लागू होणार असल्याचे राज्य शासनाने मागील वर्षी जाहीर केले होते. मात्र, ही वेतनवाढ राज्यातील शिक्षकांना देण्यात आली नसल्याचा आक्षेप शिक्षक संघटनांनी घेतला होता. त्याबाबत शासनाने राज्यातील शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याचे काल जाहीर केले आहे.
बक्षी समितीचा ‘सातवा वेतन आयोग’ अहवाल सादर
राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय व सैनिकी शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ लागू होणार आहे. शासकीय कर्मचारी व शिक्षक यांनी एकाचवेळी सुधारित वेतनवाढ जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शासकीय कर्मचार्यांसोबत शिक्षकांनाही ही वेतनवाढ पहिल्यांदाच एकसोबत लागू होत आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे.
याआधी, शासकीय कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू झाल्याच्या सहा महिन्यांनंतर शिक्षकांना सहावा वेतन लागू झाला होता. तर पाचवा वेतन आयोगाचा लाभ राज्यातील शिक्षकांना चार महिन्यांनंतर मिळाला होता.
◆◆◆