राज्यातील १०८ शिक्षकांना मिळणार ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’
आदर्श शिक्षक पुरस्कार २०१७-१८ साठी १०८ शिक्षकांची निवड झाली आहे. हा पुरस्कार सोहळा ५ सप्टेंबरला साताऱ्यात पार पडणार आहे.
मुंबई, ०१ सप्टेंबर
सन २०१७-१८ च्या ‘राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारा’साठी शासनातर्फे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर १०८ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
त्यामध्ये ३८ प्राथमिक, ३९ माध्यमिक शिक्षक, १८ आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक, ८सावत्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, २ विशेष शिक्षक (कला/क्रीडा) व १ अपंग शिक्षक/अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक आणि १ गाईड शिक्षक व १ स्काऊट शिक्षक, यांचा समावेश आहे. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम ५ सप्टेंबर २०१८ला सातारा येथे होणार आहे.
समाजाची नि:स्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दरवर्षी जाहीर केला जातो,. ‘राज्य शिक्षक पुरस्कार योजना’ १९६२-६३ पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागामार्फत राबविली जाते. राज्य शिक्षक पुरस्काराची रक्कम १० हजार रुपये आहे. तसेच राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दि. ४ सप्टेंबर २०१४च्या शासन निर्णयान्वये थोक रक्कम एक लाख रुपये अदा करण्यात येते.
राज्य शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दि. १६ जुलै २०१८ च्या शासन निर्णयान्वये शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली होती.
( संदर्भ: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य )
◆◆◆