शेकडो दिव्यांनी उजळला दुर्गाडी किल्ला
मराठी ब्रेन, प्रतिनिधी
कल्याण दि. २३ नोव्हेंबर
त्रिपुरी पौर्णिमेचा शीतल चंद्रप्रकाश आणि त्याच्या जोडीला असलेल्या शेकडो दिव्यांचा संधीप्रकाशात उजळून निघालेला येथील ऐतिहासिक ‘दुर्गाडी किल्ला’ स्थानिकांना व पर्यटकांना काल पाहायला मिळाला.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त केलेल्या दिव्यांच्या आरासीमुळे दुर्गाडी किल्ला उजळून निघाला
कार्तिक पौर्णिमेला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ किंवा ‘त्रिपुरी पौर्णिमा’ असेही म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात ‘त्रिपुर वात’ म्हणजे खांबावर असलेल्या दिव्याची वात लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य काय असते याचा अनुभव काल कल्याणकरांनी घेतला. निमित्त होते ते, त्रिपुरी पौर्णिमेला ऐतिहासिक अशा दुर्गाडी किल्ल्यावरील रोषणाईचे. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आणि त्याचा शीतल प्रकाश आणि या चंद्रप्रकाशाच्या जोडीला शेकडो दिव्यांच्या संधीप्रकाशात कल्याणचा मानबिंदू असलेला ऐतिहासिक ‘दुर्गाडी किल्ला’ उजळून निघालेला पाहायला मिळाला. त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दुर्गाडी किल्ल्यावर शेकडो दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
किल्ल्याच्या पायथ्यापासून ते पार मंदिराच्या कळसापर्यंत जिथे नजर फिरेल तिकडे शेकडो दिवे आणि त्यांचा लखलखाट दिसत होता. तर किल्ल्यावर ठिकठिकाणी काढण्यात आलेली सप्तरंगी रांगोळी आणि त्याभोवती करण्यात आलेली दिव्यांची आरास अजूनच नजरेत भरत होती. जणू काही किल्ल्याला एक दिवसाकरिता का होईना, पण त्याचे गतवैभव प्राप्त झाले होते. हा सर्व रंगांचा, दिव्यांचा आणि त्यांच्या प्रकाशाचा आविष्कार पाहण्यासाठी कल्याणबरोबरच आसपासच्या परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
गेल्या पाच दशकांपासून या ठिकाणी त्रिपुरी पौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. दिवंगत मनोहर वैद्य यांच्या ‘एक घर एक पणती’ या संकल्पनेतून या उत्सवाची भक्कम अशी पायाभरणी झाली होती. त्यांच्या या पुढाकाराचे फलित म्हणून एवढ्या वर्षांनंतरही ही परंपरा अव्याहतपणे सुरू असून दर वर्षागणिक ती अधिक व्यापक बनत जात असल्याचे दिसते.
◆◆◆