समाजमाध्यमांतून शिक्षकांची ‘तंत्रस्नेही’ वाटचाल

राज्यात तंत्रस्नेही शिक्षकांचे ६० व्हाट्सॲप समूह आहेत. सोबतच इतर माध्यमांच्याद्वारे शिक्षक एका सुव्यवस्थित कार्यपद्धतींतून तंत्रस्नेही होण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्याच्या डिजिटल जगतातील शिक्षकांचा स्वयंसहायतेच्या तत्त्वातून तंत्रज्ञानाशी अवगत होत जाण्याच्या प्रवासाचा हा आढावा. 

मराठी ब्रेन / गोपाळ दंडगव्हाळे
मुंबई, २२ नोव्हेंबर २०१८

राज्यातील शिक्षकांमध्ये शैक्षणिक तंत्रकौशल्य, उपक्रमांसोबत स्वत:मधील अंगभूत गुणांचे आदान-प्रदान व्हावे, शिक्षणाच्या पध्दतीत नाविण्य यावे या उद्देशाने राज्यातील तंत्र-स्नेही शिक्षकांनी ‘तंत्र-स्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र’ या नावाने ६० व्हाट्सएप ग्रुपची निर्मिती केली आहे. या समूहांतील एकूण शिक्षकांची संख्या चौदा हजार पाचशे इतकी आहे!

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यातील तंत्र-स्नेही शिक्षकांनी व्हाट्सऍप समुहांबरोबरच टेलिग्राम, फेसबुक, ब्लॉग आणि यूट्यूबचे चॅनेलवरील समूहांचाही समावेश आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची संपूर्ण शैक्षणिक प्रक्रिया डिजिटल स्वरुपात आणून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपला खारीचा वाटा उचलण्याकडे या ग्रुपची वाटचाल सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल भारत’ या स्वप्नपूर्तीच्या दिशेने आज बऱ्याच शाळा डिजिटल झाल्या आहेत.

● शिक्षकांच्या डिजिटल समूहांची कार्यपद्धती:

जे शिक्षक तंत्रज्ञानापासून अजूनही दूर आहेत त्यांना तंत्रस्नेही बनवण्याच्या ध्यासाने सुरु झालेले ह्या ६० व्हाट्सऍप समूहांमध्ये दर सोमवारी ‘ऑनलाईन तंत्रस्नेही परीक्षा’ घेण्यात येते आणि मंगळवारी या परीक्षेचा निकाल जाहीर करून विजेत्यास डिजिटल प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. त्यानंतर शाब्दिक कोडी व टेक्नो ट्रिक्स हा उपक्रम घेतला जातो. इतकेच नव्हे तर, बुधवार ते शनिवार रोज रात्री ९:००  ते १०:०० या वेळांत तंत्रज्ञान विषयक ‘ऑनलाईन कार्यशाळा‘ आयोजित केल्या जातात. या कार्यशाळेत प्रश्नमंजूषा स्पर्धा, पीडीएफ फाइल तयार करणे, व्हिडिओ निर्मिती, जीआयएफ, ऑडियो मेकिंग, फोटो एडिटिंग, लोगो बनविणे, युट्यूब चॅनल, मेल अकाउंट तयार करणे, वर्ड, एक्सल सिट मध्ये रिझल्ट तयार करणे, नवनवीन सॉफ्टवेअर, अनुप्रयोगाची ओळख व वापर, तसेच शैक्षणिक सीडी निर्मिती व विविध मोबाईल अनुप्रयोगांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य निर्माण करण्याचे कौशल्य शिकविले जाते.

तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र राज्य

शिक्षकांची तंत्रज्ञान शिकण्याची आवड इथेच थांबत नाही. दर रविवारी महाराष्ट्रातील एका कर्तृत्ववान शिक्षकाचा गुणगौरव सोहळा आयोजीत करून, त्या शिक्षकाला प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येते. या ग्रुपवर दररोज शिक्षकांच्या तंत्रज्ञान विषयक समस्या, सरल प्रणाली बाबतच्या समस्या सोडविल्या जातात. या समूहाने ‘पहिले राज्यस्तरीय तंत्रस्नेही संमेलन’ नाशिक येथे यशस्वी पार पाडले व नुकतेच दिवाळीही अंकही प्रकाशित करून महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांना एक साहित्यिक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.

तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र या समूहाने ‘तंत्रस्नेही दीपोत्सव २०१८’ हा दिवाळी अंक प्रकाशित केला आहे.

● तंत्रस्नेही समूहांचे व्यवस्थापन:

या तंत्रस्नेही शिक्षकांच्या ग्रुपचे सभासदत्व मिळविण्यासाठी एक आचारसंहिताही ठरवून दिलेली आहे. ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उपयोगाचे शैक्षणिक तंत्र-कौशल्य, शैक्षणिक उपक्रम आदि बाबींच्या आदानप्रदानाबरोबरच विविध विषयांवर ऑनलाइन कार्यशाळा व स्पर्धा घेतल्या जातात. या ग्रुपवर होणाऱ्या स्पर्धा पूर्णत: पारदर्शक असून ग्रुपवरच विजेत्यांची नावे घोषित करून ऑनलाइन प्रमाणपत्र दिले जातात.

शिक्षकांच्या या तंत्रस्नेही वाटचालीबद्दल संबंधित व्हाट्सऍप समूहांतील सक्रिय शिक्षकांचे अभिप्राय आणि मत जाणून घेण्यात आले. या डिजिटल शैक्षणिक चळवळीत समूहाचे संस्थापक नाशिकचे नितिन केवटे, मुख्य प्रशासक भिवंडीचे भालचंद्र भोळे, फेसबुक प्रमुख निफाडचे नितिन गुंजाळ, टेलिग्राम प्रमुख रत्नागिरीचे विश्वंभर बोकडे, ब्लॉग प्रमुख सुनील बडगुजर व त्यांचे सर्व सहकारी या समूहांच्या कार्यप्रणालीसाठी सतत प्रयत्नशील आहेत. तंत्रस्नेही शिक्षकांनी तयार केलेले हे सोशल समूह सद्या शिक्षकांना प्रेरणादायी ठरत असून राज्यातील शिक्षणक्षेत्रात व अनेक शिक्षकांकडून या समूहांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

◆◆◆

 

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: