30 भारतीय कैद्यांची पाकने केली मुक्तता
इस्लामाबाद – पाकिस्तानने त्यांच्या कारागृहात असलेल्या 30 भारतीय कैद्यांची मुक्तता केली. पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे त्या पार्श्वभूमीवर सद्भावनेची कृती म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या संबंधात माहिती देताना पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मोहंमद फैजल यांनी म्हटले आहे की मानवतावादी विषयात राजकारण करायचे नाही अशी पाकिस्तानची कायमच भूमिका राहिली असून त्याच भूमिकेतून आम्ही हा निर्णय घेतला आहे.
सुटका होत असलेल्या 30 जणांपैकी 27 मच्छिमार आहेत. पाकिस्तानी कारागृहात एकूण 470 भारतीय कैदी आहेत. त्यातील 418 मच्छिमार आहेत. त्यांच्या सुटकेची प्रक्रिया अत्यंत जटील असल्याने त्यांना नाहक बराच काळ कारागृहात खितपत पडावे लागते. पाकिस्तानने आज जी सद्भावनेतून कृती केली तशीच कृती भारतानेही करावी अशी मागणीही पाकिस्तानने केली आहे.
सौजन्य: दैनिक प्रभात