ईशान्य भारतात नव्या फिव्हरचा कहर; हजारों डुकरं मृत्युमुखी!
ब्रेनवृत्त । मिझोरम
ईशान्य भारताच्या राज्यांमध्ये आफ्रिकी स्वाईन फिव्हरने (ASF) हाहाकार माजवला असून, मिझोरममध्ये फक्त तीन महिन्यांत ९,००० हून अधिक डुकरांचे मृत्यू झाले आहे. मिझोरमच्या ११ पैकी १० जिल्ह्यांतील डुकर पालनगृहांमध्ये एएसएफचा कहर माजला आहे.
मागील वर्षी ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि मणिपूर हे राज्य आफ्रिकी स्वाईन फिव्हरने मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. त्यावेळी मिझोरममध्ये शेजारील राज्यांमधून व सीमावर्ती देशांतून डुकर व त्यांचे मांस (पोर्क) आयात करण्यावर बंदी होती, त्यामुळे मिझोरम सुरक्षित होते. पण त्यानंतर कोव्हिड-१९चे निर्बंध शिथिल केल्यानंतर एएसएफचा मिझोरममध्ये शिरकाव झाला आणि राज्याला मोठा तडाखा बसला आहे.
मिझोरममध्ये आफ्रिकी स्वाईन फिव्हरमुळे गेल्या तीन महिन्यांत ९००० हुन अधिक डुकरे मृत्युमुखी पडली आहेत. राज्यातील एकूण ११ पैकी १० जिल्ह्यांमध्ये एएफचे सर्वाधिक संक्रमण आहे.
वाचा । शरीरातील रोगप्रतिकार शक्ती अल्फा, बिटाशी लढण्यात असमर्थ!
> आफ्रिकी स्वाईन फिव्हरबद्दल (ASF : African Swine Fever)
आफ्रिकी स्वाईन फिव्हर हा एक अतिशय सांसर्गिक व जीवघेणा विषाणूजन्य आजार असून, सर्व वयोगटांतील पाळीव तसेच जंगली डुकरांना प्रभावित करतो. अस्फारव्हिरीडी कुटुंबातील डबल स्ट्रॅन्डेड डीएनए विषाणूपासून हा आजार होतो.
एएसएफचे पहिले प्रकरण जवळपास १०० वर्षांपूर्वी केनियामध्ये आढळले होते. उच्च ज्वर, भूक न लागणे, त्वचेतून व आंतरिक इंद्रियांतून रक्तस्त्राव होणे ही या आजराची काही लक्षणे आहेत. एएसएफचे संसर्ग झालेलं डुकर २ ते १० दिवसांच्या आत मरण पावते.
या आजारामुळे होणारा मृत्युदर १००% आहे. सद्याच्या परिस्थितीत या आजारावर कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नसून, आजराच्या उद्रेकाला टाळण्यासाठी म्हणून विशिष्ट प्राण्यांना समूहात वेगळे करणे (कलिंग) हा एकच पर्याय आहे. एएसएफ आजार डुकरांपासून माणसाकडे संक्रमित होत नसल्यामुळे या आजाराचा माणसाला धोका नाही.
अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.
फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.
तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.