आज ताजमहलमध्ये मोफत प्रवेश !
बकरी ईद निमित्ताने आज सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत पर्यटकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
ब्रेनवृत्त | आग्रा
१२ ऑगस्ट २०१९
आज, १२ ऑगस्ट रोजी बकरी ईदच्या निमित्ताने जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले ताजमहल आज तीन तास मोफत प्रवेशासाठी खुले असणार आहे. आज सकाळी ७ ते १० पर्यंत ताजमहलमध्ये पर्यटकांना निशुल्क प्रवेश देण्याचा निर्णय पुरातत्व खात्याने घेतला आहे.
बकरी ईदच्या निमित्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम नागरिक विशेष नमाज पठणासाठी येत असतात. सोबतच या दिवशी पर्यटकांची संख्याही जास्त असते, या गोष्टीला लक्षात घेऊन पुरातत्त्व विभागाने पर्यटकांसाठी ताजमहलमध्ये सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत मोफत प्रवेश देण्याचे ठरवले आहे. यामुळे देशातील व विदेशातील हजारो पर्यटकांना या निशुल्क सेवेचा फायदा घेता येईल. सोबतच विशेष सुरक्षिततेसाठी काळजीही घेतली जाणार आहे. त्यानंतर मात्र पर्यटकांकडून नेहमीप्रमाणे शूल्क आकारले जाणार आहे.
दिल्लीत सापडली २५४ मध्ययुगीन नाणी!
● डिसेंबर २०१८ मध्ये करण्यात आली होती शुल्कवाढ
मागील वर्षी १० डिसेंबर महिन्यात ताजमहलच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. स्वदेशी व विदेश पर्यटकांसाठी आधी अनुक्रमे ₹५० व ₹११०० प्रति तिकीट इतके प्रवेश शुल्क आकारले जात होते. त्यात वाढ करून आता स्वदेशी पर्यटकांसाठी ₹२५० व विदेशी पर्यटकांसाठी ₹१३०० करण्यात आले आहे. ताजमहल बघायला दरदिवशी जवळपास ४०,००० पर्यटक येत असतात. आठवड्याच्या व सुट्टीच्या दिवशी ही संख्या ६०,००० ते ७०,००० पर्यंत पोहचते.
◆◆◆