९ जुलैपासून ऑटोरिक्षा संघटनांचा राज्यव्यापी संप
मुंबई, ७ जुलै
राज्यातील ऑटोरिक्षा मालक व चालकांनी ९ जुलैला राज्यव्यापी संप पुकारला आहे. ओला व उबरसारख्या टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात याव्या या मागणीसह राज्यातील ऑटो मालक-चालक कृती समितीने हा संप पुकारला आहे.
छायाचित्र : ट्विटर
राज्यातील ओला, उबर यांसारख्या टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात याव्यात या मागणीसह राज्यातील ऑटोरिक्षा चालक-मालक ९ जुलैपासून संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. ओला व उबर सेवांच्या बंदीसोबतच हकीम समितीच्या शिफारसी शासनाने तात्काळ लागू कराव्यात, हा मुद्दाही या संपाचा केंद्रबिदू असणार आहे. ८ जुलैच्या मध्यरात्रीपासून राज्यभरातील ऑटोरिक्षा चालक-मालक बेमुदत संपावर जाणार आहेत. विविध प्रलंबित मागणीसह ऑटोरिक्षा चालक कृती समितीने ऐन पावसाळ्यात पुकारलेल्या या संपाने प्रवाशांना फटका बसणार आहे.
● ऑटोरिक्षा संघटनांच्या मागण्या
– ओला व उबेरसारख्या अवैध सेवांंवर त्वरित बंदी आणावी
– राज्यशासनाने स्थापन केलेले ऑटोरिक्षा चालक-मालक कल्याणकारी मंडळ परिवहन खात्यात आणावे
– राज्यातील अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील भरारी पथकाची स्थापना करणे
– हकीम समितीच्या भाडेवाढीच्या शिफारसी लागू करणे
– विम्याचे पैसे विमा कंपनीत न भरता महामंडळात भरण्याची तरतूद करणे व विम्यात होत असलेली वाढ कमी करणे
९ जुलैला पुकारलेल्या संपात राज्यातील एकूण १८ लाख व त्यांपैकी मुंबई व नवी मुंबईतील १ लाख ७५ हजार रिक्षा चालक-मालक संपावर जाणार आहेत. नागपूरसह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, नवी मुंबई व औरंगाबाद येथील ऑटोरिक्षा संघटना या संपात सहभागी होणार असल्याचे ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी म्हटले आहे.
◆◆◆