लोकलचा पेंटग्राफ तुटून कर्जत-कल्याण रेल्वेसेवा विस्कळीत
मराठीब्रेन | गोपाळ दंडगव्हाळे
मुंबई, १७ जुलै
मुंबईकरांवरची संकंटांची मालिका काही संपायचे घेतांना दिसत नाही आहे. काल डोंगराची दुर्घटना घडली तर आज मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ काही बंद होण्याचे नाव घेत नाहीये. लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने ५ महिला तर २ पुरुष प्रवासी गंभीर जखमी झाल्याचा प्रकार कल्याण आणि विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान घडला आहे. या प्रकारामुळे कर्जत-कल्याण हा रेल्वेमार्ग पूर्ण ठप्प पडला आहे.
आज सकाळी साडे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. बदलापूरहून निघालेली मुंबई लोकलने विठ्ठलवाडी सोडल्यानंतर अचानक त्याचा पेंटोग्राफ तुटला. तर त्याची वायर अंगावर पडल्याने प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या जखमी प्रवाशांना रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेमुळे ऐन सकाळच्या वेळेत मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी अनेक प्रवाशांनी लोकलमधून कल्याणच्या दिशेने पायी चालत जाण्याचा पर्याय अवलंबला.


दुसरीकडे, कर्जत-खोपोली आणि अंबरनाथ तसेच कल्याण- ठाणे- डोंबिवली स्टेशनवरून विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तसेच कल्याण,डोंबिवली आणि ठाणे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठीही मध्य रेल्वे चालवणार विशेष लोकल गाड्या सोडणार आहे. त्याच बरोबर कल्याण डोंबिवली परिवहन सेवेच्या विशेष बस गाड्या देखील कल्याण ते बदलापूर मार्गावर चालवणार असल्याची माहिती केडीएमटी प्रशासनाने दिली आहे.
◆◆◆