अजून पुढील पाच महिने मिळणार अतिरिक्त अन्नधान्य !
ब्रेनवृत्त । नवी दिल्ली
कोरोना विषाणू आजाराच्या पार्श्ववभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएफएसए) देण्यात येणाऱ्या अतिरिक्त अन्नधान्य वाटपाला अजून पाच महिन्यांसाठी वाढवण्यात आले आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत लाभार्थ्यांना अतिरिक्त अन्नधान्याच्या वाटपाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (बुधवारी) मान्यता दिली.
जवळपास ८१.३५ कोटी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत दरमहा प्रतिव्यक्ती ५ किलो अतिरिक्त अन्नधान्य वाटप सुरूच ठेवण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता दिली, असे शासकीय निवेदनात म्हटले आहे. या अतिरिक्त अन्नधान्यावर ₹ ६४,०३१ कोटींचे अनुदान दिले जाईल, असेही या निवेदनात नमूद आहे.
शासनाद्वारे जाहीर केलेल्या संबंधित निवेदनात असेही म्हटले आहे, “या योजनेचा संपूर्ण खर्च केंद्रशासन उचलत आहे आणि यामध्ये राज्य/केंद्रशासित प्रदेशांचे कोणतेही योगदान नाही. यामुळे भारत शासनाला वाहतूक आणि हाताळणी, तसेच एफपीएस डीलर्सच्या मार्जिन इत्यादींसाठी सुमारे ₹ ३,२३४.८५ कोटींचा अतिरिक्त खर्च येणार आहे. अशाप्रकारे भारत शासनाकडून एकूण ₹ ६७,२६६.४४ कोटी खर्च होतील.”
वाचा । अंगणवाडी व कुपोषणारील परिणामांचे सर्वेक्षण करण्याच्या शासनाला सूचना !
पुढील पाच महिन्यांत एकूण २०४ लाख मेट्रिक टन अन्नधान्य वितरित केले जाण्याचा अंदाज आहे. “कोव्हिड-१९ मुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीचा गरीबांना होणारा त्रास अन्नधान्याच्या अतिरिक्त वाटपामुळे कमी करता येईल. येत्या पाच महिन्यांत कोणत्याही गरीब कुटुंबाला धान्य न मिळाल्याच्या कारणाने त्रास सहन करावा लागणार नाही”, असेही संबंधित निवेदनात म्हटले आहे.