धरण सुरक्षा विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी

धरण सुरक्षा विधेयक २०१९’ला काल मंजुरी मिळाल्याने देशात पहिल्यांदाच धरण सुरक्षेसाठी कायदा केला जाणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या 5264 मोठ्या आणि बांधकाम चालू असलेल्या 437 मोठ्या धरणांसह भारत जागतिक पातळीवर मोठ्या धरणांच्या संख्येबाबत तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे

 

मराठी ब्रेन | सागर बिसेन

१८ जुलै २०१९


देशातील विविध धरणांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल ‘धरण सुरक्षा विधेयक 2019′ चा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी  राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाला 5 हजार 600 धरणे नियंत्रण करण्यासाठी देण्याच्या निर्णयालाही मंजुरी देण्यात आली, असल्याची माहिती केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

‘धरण सुरक्षा विधेयक २०१९’ ला केंद्रीय मंत्रिमंडळाने संमती दिली आहे.

धरणांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारची कायदेशीर तरतूद नसल्याने नवा कायदा तयार करण्यात येणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली. “देशात धरणांसाठी सुरक्षा विधेयक येणार आहे. देशात 5 हजार लघु आणि मध्यम व तसेच मोठ्या आकाराची धरणे आहेत. 4 हजार 700 लघु आणि मध्यम आकाराची धरणे नव्याने बांधली जातील. मात्र, यासाठी कोणत्याही कायद्याची तरतुद नाही, त्यामुळे हा कायदा केला जाणार आहे”, असे ते म्हणाले.

देशातील महत्त्वाच्या ९१ धरणांमध्ये फक्त ७० टक्के पाणी!

देशात धरण सुरक्षेसाठी पहिल्यांदाच कायदा केला जाणार आहे. धरण सुरक्षा विधेयकांतर्गत आवश्यक ती नियमावली बनवण्यात आली आहे. त्याचसोबतच उत्तरदायित्व सुद्धा ठरवले जाणार आहे. यासाठी सुरुवातीला प्रत्येक धरणावर नियमित तपासणी प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. नव्याने धरण बांधतेवेळी तज्ज्ञांचे मत घेतले जाणार आहे. धरण सुरक्षा कायद्याविषयी बोलताना जावडेकर यांनी महाराष्ट्रातील तिवरे धरणाचाही त्यांनी उल्लेख केला. नुकत्याच दोन आठवड्यांपूर्वी तिवरे धरण फुटल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यावेळी 14 लोकांना प्राण गमवावे लागले. देशात याआधीही अनेेेक धरण फुटीच्या प्रकरणांत हजारो लोकांना जीव गमवावा लागला आहे.

 

● देशातील धरण संरचना

सध्या कार्यरत असलेल्या 5264 मोठ्या आणि बांधकाम चालू असलेल्या 437 मोठ्या धरणांसह भारत जागतिक पातळीवर चीन आणि अमेरीकेनंतर मोठ्या धरणांच्या संख्येबाबत तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. या धरणांची 283 अब्ज घन मीटर (BCM) एवढे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. मोठ्या धरणांपैकी सुमारे 80% धरणांचे बांधकाम 25 वर्षांहून अधिक जुने आहे. सुमारे 209 धरणे 100 वर्षांहून अधिक जुने आहेत.

 

हे वाचलंत का? रेल्वे निघाली घेऊन पाणी, चेन्नईत पाणीबाणी !

 

● धरण सुरक्षितता परिषद 

फेब्रुवारी महिन्यात देशातील धरणांच्या दुरुस्तीच्या संदर्भात भुवनेश्वर येथे पाचवी ‘आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षितता परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन जागतिक बँकेकडून समर्थित ‘धरण पुनर्वसन आणि दुरूस्ती प्रकल्प’ (DRIP) याच्या अंतर्गत भारत सरकार, ओडिशा सरकार आणि जागतिक बँक यांनी संयुक्तपणे केले आहे. हा एक वार्षिक कार्यक्रम आहे. धरणाच्या सुरक्षिततेशी संबंधित सर्व पैलूंवर विचार करणे आणि त्यासंदर्भात सर्वोत्तम उपाययोजना करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: