आशियातील सर्वात लांब बोगद्याला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा केंद्राचा निर्णय
ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
आशियातील सर्वात लांब बोगदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘चेनानी-नाशरी’ बोगद्याला जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्ग-४४ वरील या बोगद्याचे नव्याने नामकरण करण्याचे केंद्र शासनाने ठरवले असून, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत काल घोषणा केली.
जम्मू-काश्मीरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘चेनानी-नाशरी’ बोगद्याला पुनर्नामित करून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचे केंद्राने ठरवले आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे संस्थापक होते व त्यांनी देशासाठी ‘एक निशान, एक विधान व एक प्रधान’ हा मंत्र दिला होता.
Union Minister Nitin Gadkari: Chenani-Nashri Tunnel on NH 44, in J&K to be named after Dr. Shyama Prasad Mukherjee. This is our humble homage to Shyama Prasad Ji whose battle for Kashmir, 'One Nation One Flag' has immensely contributed in national integration. (file pic) pic.twitter.com/EVJabzCH7Y
— ANI (@ANI) October 16, 2019
जम्मू–श्रीनगर महामार्गावरील रामबन जवळील ‘चेनानी-नाशरी’ या बोगद्याची निर्मिती कार्याची सुरुवात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सन २०११ मध्ये करण्यात आली. या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २०१७ मध्ये या बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे ९ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील अंतर ४० किमीने कमी झाले, तर प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी झाला.
हेही वाचा : जाणून घ्या ‘इंदूर-मनमाड लोहमार्ग’ सामंजस्य करार
● ‘चेनानी- नाशरी’ बोगदा
– हा बोगदा राष्ट्रीय महामार्ग- ४४ वरील उधमपूर जिल्ह्यातील चेनानी येथे सुरू होऊन रामबन जिल्ह्यातील नाशरी येथून बाहेर पडतो.
– या बोगद्याचे निर्मिती कार्य २३ मे २०११ मध्ये सुरू होऊन २०१७ मध्ये पूर्ण झाले. सुमारे ७ वर्षांचा कालावधी या बोगद्याला बांधण्यास लागला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे के बांधकाम करण्यात आले.
– दुहेरी लेनचा असलेल्या या बोगद्याची लांबी ९.०२ किलोमीटर इतकी आहे. हा बोगदा समुद्रसपाटीपासून सुमारे १ हजार २०० उंचीवर बांधण्यात आला आहे.
हे वाचलंत का? चीन तयार करतोय ‘कृत्रिम चंद्र’ !
– या बोगद्याच्या निर्मितीसाठी एकूण ३ हजार ७२० कोटी रुपये इतका खर्च आला असून, या कार्यात १ हजार ५०० कामगार, अभियंते आणि भूगर्भतज्ज्ञांनी मेहनत घेतली.
– बोगद्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी सुमारे १२४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सोबतच, दोन लेनवर प्रत्येल ३०० मीटरच्या अंतरावर असे एकूण २९ क्रॉस पॅसेज देण्यात आले आहेत. प्रत्येक ३०० मीटर अंतरावर एक पॅसेज आहे.
– प्राणवायूचा तुटवडा भासू नये म्हणून तशी सुविधा बोगद्यात उपलब्ध आहे. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास वाहनतळाची सोयही यात आहे.
◆◆◆