‘कोव्हिड-१९’मुळे आफ्रिकेत पाच लाख एड्सग्रस्त दगावण्याची शक्यता
‘जागतिक आरोग्य संघटने‘ने (WHO) प्रतिकृती अभ्यास (Modelling) आणि ‘संयुक्त राष्ट्रे एड्स’ (UNAIDS)च्या अंदाजावरून, २०२० ते २०२१ दरम्यान कोरोना विषाणूमुळे उप-सहारा (Sub-Saharan) भागातील सुमारे पाच लाख एड्सग्रस्तांना आपले प्राण गमवावे लागू शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे.
ब्रेनवृत्त, १४ मे
कोरोना विषाणूने जगभरात हजारो लोकांचे प्राण घेतले आहेत. तरीही, कोणालाही या महामारीवर लस शोधण्यात अद्याप यश आलेले नाही. अशातच आता ‘जागतिक आरोग्य संघटने‘ने (WHO) प्रतिकृती अभ्यास (Modelling) आणि ‘संयुक्त राष्ट्रे एड्स’ (UNAIDS) च्या अंदाजावरून, २०२० ते २०२१ दरम्यान कोरोना विषाणूमुळे उप-सहारा (Sub-Saharan) भागातील सुमारे पाच लाख एड्सग्रस्तांना आपले प्राण गमवावे लागू शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे. इतक्या लोकांचा मृत्यू झाल्यास २००८ मध्ये एड्समुळे झालेल्या मृत्यूंचाही विक्रम तुटेल, असेही या अभ्यासात म्हटले आहे.
चीनमध्ये उगम झालेल्या कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगाने आतापर्यंत जगभरातील ४४ लाख लोक बाधित झाले आहेत. जगभरातील शास्रज्ञ या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी व लस तयार करण्यासाठी झटत आहेत. मात्र, कोणालाही अद्याप यश आलेले नाही. या परीस्थितीत ‘डब्ल्यूएचओ‘च्या अभ्यासामुळे जगावर दुहेरी संकट ओढवणार असल्याचे असल्याचे चित्र दिसत आहे. तथापि, आधीच एखाद्या गंभीर आजाराने ग्रासलेल्या रुग्णाला कोरोनाचा धोका जास्त असल्याचे काही अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.
दुसरीकडे, ‘कोव्हिड-१९’चे संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण जगभरात लॉकडाऊन आहे. वाहतुकीपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा भासत आहे. त्याचा परिणाम वैद्यकीय सेवा-सुविधांवरही झाला आहे. त्यातच एड्सच्या रुग्णांना नियमितपणे गोळ्या-औषधे आणि थेरपी घ्यावी लागते. मात्र, या टाळेबंदीमुळे सर्वच आरोग्य यंत्रणांवर ताण वाढला आहे.
हेही वाचा : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेतील स्त्री-पुरुष ‘समानता’!
● आफ्रिकेत खालावली आरोग्य व्यवस्था
कोरोनामुळे आफ्रिकेतील आरोग्य व्यवस्था तर पुरती खालावली आहे. एचआयव्ही क्लिनिकमध्ये अँटीरेट्रोव्हायरल (ARV) पुरविल्या जात नसल्याने रूग्णांच्या संख्येत गंभीर वाढ होऊ शकते.
आफ्रिकेतील एड्सग्रस्त रुग्णांवर अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (ART) केली जाते. त्यामुळे २०१० पासून आफ्रिकेत मुलांमधील एड्सच्या संक्रमणाचे प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले होते. पण, लॉकडाऊनच्या काळातही त्यांना औषधं आणि थेरपी मिळाली नाही, तर पुन्हा एड्सग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊ शकते, अशी शक्यता या अभ्यासात वर्तविली आहे. इतकेच नव्हे, तर येत्या सहा महिन्यांत आफ्रिकेतील मोझांबिकमध्ये ३७ टक्के, मलावी आणि झिम्बाब्वेमध्ये ७८ टक्के आणि युगांडामध्ये १०४ टक्के मुलांना एड्स होण्याचा सर्वाधिक धोका असल्याची भीतीही जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
दरम्यान, ‘संयुक्त राष्ट्रे बाल निधी‘ने (युनिसेफ) आपल्या एका अहवालात अशीच एक शंका व्यक्त केली आहे. पुढील सहा महिन्यात भारतात तीन वर्षाखालील तीन लाख बालकांचा मृत्यू होऊ शकतो, तसेच देशात कोरोनामुळे जे मृत्यू होत आहेत त्यापेक्षा हा आकडा वेगळा असेल, असे युनिसेफने स्पष्ट केले आहे. भारताप्रमाणे जगातील सर्व देश आपल्याकडील वैद्यकीय साधन सामग्री कोविड १९ च्या रुग्णांवर उपचारासाठी वापरत असल्यामुळे जगभरातील इतर गंभीर आजारांकडे आणि त्यांच्या उपचारांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याचाच गंभीर परिणामांची शक्यता युनिसेफ आणि डब्ल्यूएचओ वर्तविली आहे.
#ब्रेनविश्लेषण | #कोव्हिड_१९ मुळे कोलमडलेली नियमित वैद्यकीय पुरवठा साखळी, शालेय पोषण आहार, #लसीकरण इ. थांबलेल्या यंत्रणांमुळे येत्या काळात लाखोंच्या संख्येत बालमृत्यूंची मोठी शक्यता @UNICEFने वर्तवली आहे. #UNICEF #ChildRights #मराठी #म #Covid_19 #अहवालhttps://t.co/tUMiFuTjyb
— marathibrain.in (@marathibrainin) May 14, 2020
कोरोना संक्रमणाच्या या परिस्थितीत, पुरेशा आरोग्य सुविधांचा अभाव मुलांच्या आरोग्यावर गंभीरपणे परिणाम करू शकतो. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत भारतातील पाच वर्षांखालील तीन लाख बालकांचा मृत्यू होऊ शकतो. तर, संपूर्ण दक्षिण आशियामध्ये पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण सुमारे चार लाख ४० हजारांपर्यंत पोहोचू शकते. यांपैकी बहुतेक मृत्यू भारतात होणार असल्याचा अंदाजही युनिसेफने वर्तवला आहे.
◆◆◆