मोदींना ‘इतिहास’तरी माहीत आहे का? : कपिल सिब्बल

भाकरा नांगल धरण, सरदार सरोवर धरण, तेहरी धरण मोदींच्या आजी-आजोबांनी बांधले की त्यांच्या पक्षाने बांधले आहे? असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी मोदींना केला आहे.

 

वृत्तसंस्था एएनआय

शनिवार, १७ नोव्हेंबर

‘ज्या इतिहासाविषयी मोदी बोलतात, त्या इतिहासाबद्दल त्यांनातरी काही माहीत आहे का? देशातील विविध धरण मोदींच्या आजी-आजोबांनी बांधलेत का? असे प्रश्न काँग्रेसचे जेष्ठ नेते कबिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींना विचारले आहेत.

काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ‘गांधी-नेहरू आणि काँग्रेस’ संबंधित विधानावर चोख प्रत्युत्तर म्हणून मोदींनाच प्रश्न केले आहेत. मोदींना इतिहासतरी माहिती आहे का, असा प्रश्न सिब्बल यांनी केला आहे. “मला वाटत नाही की मोदी जे बोलतात त्यावर विचार करत असतील. भाकरा नांगल धरण, सरदार सरोवर धरण, तेहरी धरण हे सर्व कुणी बांधले, याचे उत्तर पंतप्रधान मोदींनी द्यावे. हे सर्व धरण त्यांच्या आजी-आजोबांनी बांधले की त्यांच्या पक्षाने बांधले आहेत? भारतीय इतिहासाबाबत त्यांना काही माहीत आहे?”, असे कपिल सिब्बल म्हणाले.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ‘चले जाव’ आंदोलनातही मोदींच्या संबंधित लोकांची देशाला सोबत नव्हती, असेही सिब्बल म्हणाले. “ते (भाजपचे नेते) ब्रिटिशांना मदत करणारे होते. मोदींचे आजी-आजोबा १९४२ सालच्या ‘भारत सोडा’ आंदोलनमध्ये ब्रिटिशांच्या बाजूने होते. दुर्दैवाने मोदींना त्यांच्या ह्या पूर्वजांबद्दलही माहीत नाही? मला वाटलं त्यांना माहिती असेल”, असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला आहे.

काल छत्तीसगडमध्ये निवणुकांच्या प्रचारसभेत मोदींनी, काँग्रेसने पुढील निवडणुकांमध्ये नेहरू-गांधी घराण्यांबाहेरील व्यक्तीला पंतप्रधानपदाचा उमेदवार करावे, असे आव्हान केले होते. यावर कपिल सिब्बल यांनी, पंतप्रधान मोदींना भारतीय इतिहासच माहिती नसल्याचे वक्तव्य करत कालच्या विधानाला प्रत्युत्तरच दिले आहे.

दरम्यान, मोदींनी काँग्रेसला केलेल्या कालच्या आव्हानाला उत्तर म्हणून काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यांनंतर देशाला योगदान देणाऱ्या नेहरू-गांधी घराण्याबाहेरील महत्वपूर्ण अशा १५ काँग्रेस नेत्यांची संपूर्ण यादीच जाहीर केली आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: