ड्रॅगन पॅलेस जागतिक वारसा व्हायला हवे : मुख्यमंत्री
मराठीब्रेन वृत्त
नागपूर, २४ नोव्हेंबर
भारत आणि जपान या दोन देशांमधील मैत्रीचा धागा नागपूरच्या ड्रॅगन पॅलेसमुळे दृढ झाला असून, ड्रॅगन पॅलेस जागतिक वारसा व्हायले हवे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरात आयोजित एका कार्यक्रमात केले. नागपूरच्या कामठी येथील दादासाहेब कुंभारे परिसरात आयोजित ड्रॅगन पॅलेसच्या एकोणविसाव्या वर्धापनदिनी ते बोलत होते.

ड्रॅगन पॅलेसच्या एकोणिसाव्या वर्धापनदिनानिमित्त काल आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले, “भारत व जपान या दोन देशातील मैत्रीचा धागा दृढ करण्याचे काम येथील ‘ड्रॅगन पॅलेस’च्या रूपाने होत आहे. ड्रॅगन पॅलेसमुळे नागपूर जगाच्या नकाशावर येत आहे. ड्रॅगन पॅलेस हे स्थळ जागतिक वारसा झाले पाहिजे. राज्य शासन हा वारसा जपण्याचे काम करेल.”

नागपूरच्या कामठी येथील दादासाहेब कुंभारे परिसरात आयोजित ड्रॅगन पॅलेसच्या एकोणविसाव्या वर्धापनदिनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, आंतरराष्ट्रीय निचीरेन-शु फेलोशिप असोसिएशन चिबा जपान येथील प्रमुख भदन्त कानसेन मोचीदा यांसह जपान येथील भिक्षुगण उपस्थित होते.
संबंधित : ड्रॅगन पॅलेसमध्ये होणार ‘आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट शांती परिषद’
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, पुढील हजार वर्ष टिकणारे काम ड्रॅगन पॅलेसच्या रूपाने सुलेखा कुंभारे यांनी केले आहे. दरवर्षी जगभरातून लाखो लोक इथे भेट देतात. चीन, जपान, कोरिया, साउथ इस्ट एशिया या देशात भगवान बुद्धाचा विचार पोहोचला व रूजला. त्यामुळे भारताबद्दल या देशामध्ये आत्मीयता आहे. जगभरातून आलेल्या लोकांमध्ये बुद्धाच्या भूमीवर आलो ही बाब त्यांना समाधान देते.
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सोपा मार्ग भगवान बुद्धांनी दाखवला. ड्रॅगन पॅलेसच्या माध्यमातून बोधीसत्वाचा, पंचशीलाचा संदेश पोहचविला जात असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
◆◆◆