फर्ग्युसन महाविद्यालयाने ऐनवेळी रद्द केले न्यायमूर्ती कोळसे पाटील यांचे व्याख्यान

उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाची परवानगी प्रशासनाने ऐनवेळी रद्द केल्याने फर्ग्युसन महाविद्यालयातगोंधळ. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी न्या. कोळसे पाटील यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करून नोंदवला निषेध. 

 

मराठीब्रेन | सागर बिसेन

पुणे, २१ जानेवारी

उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांच्या ‘भारतीय राज्यघटना’ या विषयावर आयोजित व्याख्यानाला फर्ग्युसन महाविद्यालयाने आधी दिलेली परवानगी ऐनवेळी रद्द केली. यामुळे महाविद्यालयात आज दुपारी गोंधळ उडाला व तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे न्यायमूर्ती कोळसे पाटील यांचे व्याख्यान महाविद्यालयाच्या खुल्या आवारातच पार पडले. दरम्यान, एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी कोळसे-पाटील यांच्यावर लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल असल्याचे आरोप करत त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली व सदर व्याख्यानाला विरोध दर्शविला.

महाविद्यालयाने ऐनवेळी परवानगी रद्द केल्याने माजी न्या. बी. जे. कोळसे पाटील यांनी खुल्या आवारात व्याख्यान दिले.

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘युवाजागर’ व्याख्यानमालेचे आयोजन राज्यातील नावाजलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयात आजपासून करण्यात आले आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्राला ‘भारतीय राज्यघटना : १९५० ते २०१८’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांतर्फे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांना आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम आज १२ ते ३:०० या वेळेत महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात (अँफिथेटर) नियोजित होता. महाविद्यालयाच्या प्राचार्यांची स्वाक्षरी असलेले निमंत्रण पत्रही बी. जे. कोळसे पाटील यांना देण्यात आले होते.

‘भारतीय राज्यघटना’ या विषयावर बोलण्यासाठी न्या. कोळसे पाटील यांना फर्ग्युसन महाविद्यालयातर्फे निमंत्रण देण्यात आले होते.


मात्र, अचानक ऐनवेळीच महाविद्यालय प्रशासन व डेक्कन एज्युकेशन सोसायटीने ही परवानगी रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. शेवटी, महाविद्यालयाने अँफिथेटर उपलब्ध न करून दिल्याने न्या. बी. जे. कोळसे पाटील यांनी गोंधळातच महाविद्यालयाच्या खुल्या आवारात आपले व्याख्यान पूर्ण केले.

व्याख्यानमालेचे आयोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर कळले की, कोणतेही कारण न सांगता महाविद्यालयाने शनिवारी रात्री कार्यक्रमाला अगोदर दिलेली परवानगी रद्द केली. ऐनवेळी नाकारलेली परवानगी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडवणारी ठरली. ‘आम्ही आगाऊ बुकिंग करून ₹१००० महाविद्यालय प्रशासनाला जमा करून आहोत. आम्ही विद्यार्थ्यांनी ते पैसे जमा केले आहेत. मात्र आज प्रशासनाने अँफिथेटरच्या चाव्या आम्हाला दिल्या नाहीत. प्रशासन भारतीय राज्यघटनेवरील व्याख्यान का होऊ देत नाही हा प्रश्न आहे’, असे आयोजक विद्यार्थी म्हणाले.

संविधानावर आयोजित व्याख्यानाला रद्द करण्यात महाविद्यालयावर नेमका कुणाचा दबाव आहे? हा प्रश्न आयोजक विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

सोबतच, ‘संविधान बचाव’ चा जागर पुकारला असताना विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात येते हे अत्यंत चुकीचे आहे. कॉलेज प्रशासनावर नेमका कुणाचा दबाव आहे, असा प्रश्न व्याख्यानाच्या संयोजिका शर्मिला येवेले यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या नकाराला न जुमानता आयोजक विद्यार्थ्यांनी न्या. कोळसे पाटील यांचे व्याख्यान महाविद्यालयाच्या परिसरातच आयोजित केले.

व्याख्यानाची सुरुवात होताच महाविद्यालयातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विद्यार्थ्यांनी न्या. बी. जे. कोळसे पाटील यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत व्याख्यानाला विरोध दर्शविला. लैंगिक अत्याचाराचे (#MeToo) आरोप असलेला व राज्यघटना न पाळणारा व्यक्ती राज्यघटनेवर काय बोलणार, असे आरोप करत विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला. ‘जय भीम, जय शिवराय’ अशा घोषणाही एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी दिल्या. ‘कोळसे पाटील गो बॅक’, ‘न्या. कोळसे पाटलांचा निषेध असो’ अशा घोषणा देत ‘भारतीय राज्यघटनेवर’ बोलण्यास आलेल्या निवृत्त न्या. बी. जे. कोळसे पाटील यांना विरोध करण्यात आला. विरोधकांमधीलच काही विद्यार्थ्यांनी आमचा विरोध व्याख्यानाला नसून, व्यक्तीला विरोध असल्याचेही म्हटले आहे. व्याख्यानाच्या वेळीच महाविद्यालयाच्या आवारात दोन विद्यार्थी गटांमध्ये घोषणाबाजी झाली आणि  गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र  दरम्यान, न्या. कोळसे पाटील यांनी आपले व्याख्यान गोंधळातच संपवले आणि निघून गेले.

अभाविपच्या विद्यार्थ्यांनी न्या. कोळसे पाटील यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करून कार्यक्रमावर निषेध नोंदवला

व्याख्यानाच्या वेळी बोलताना, ‘राज्यघटना’ या विषयावर बोलण्याला आज महाविद्यालयात प्रशासनाद्वारेच विरोध होत आहे, असे मत न्यायमूर्तींनी मांडले. न्या. बी. जी. कोळसे पाटील म्हणाले की, संविधानाच्या विषयावर बोलण्यासाठी आले असताना कार्यक्रम रद्द झाल्याचे कळाले आणि येथील गोंधळ पाहिल्यावर आश्चर्य वाटले. टिळकांना अभिवादन करूनच मी भारतीय संविधानावर बोलण्यासाठी आलो होते. मात्र आज टिळकांच्याच महाविद्यालयात मला बोलायची परवानगी नाही. छ. शाहूंच्या व शिरोळे पाटील यांच्या सहकार्याने फर्ग्युसन महाविद्यालय उभे राहिले आहे. त्यामुळे आजच्या विरोधाला प्रशासनाने वैचारिक उत्तर द्यावे. इथे फक्त मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकावर बोलणार आहे. संविधान सभेत प्रस्तावनेची सुरुवात कोणत्याही धार्मिक श्लोकाने किंवा सुभाषिताने न करता ‘आम्ही भारताचे लोक’ याने करावी असे डॉ. बाबासाहेबांनी त्यावेळी सुचवले होते.’

महाविद्यालयाने व्याख्यानाची परवानगी रद्द केल्याने माजी न्या. बी. जे. कोळसे पाटील यांनी खुल्या आवारात गोंधळातच व्याख्यान पूर्ण केले.

ज्या विद्यार्थ्यांना माझा विरोध आहे, त्यांनी आधी माझे भाषण ऐकावे. दरवेळीसारखी दबंगबाजी चालणार नाही, विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार मांडावे, वैचारिक विरोध करावा, असेही ते सुरुवातीला म्हणाले.

दुसरीकडे, व्याख्यानासाठी श्रोते म्हणून उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांकडून (नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवरून) त्यांची मते जाणून घेतल्यावर कळले की , या सर्व घटनांमुळे दैनंदिन तासिकांमध्ये व्यत्यय येतो आणि अशा सर्व गोष्टींमुळे महाविद्यालयात विविध विचारसरणीचे गट तयार होत जातात व सोबतच शैक्षणिक वातावरण दूषित होते.

शेवटी, विद्यार्थ्यांनी आयोजित कार्यक्रमाला प्रथम परवानगी देऊन नंतर ती नाकारली जाणे, हा मुद्दा आयोजक विद्यार्थ्यांसाठी प्रश्नांकित आहे. मुख्य म्हणजे या सर्व गोंधळात आणि वादाच्या वातावरणात महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया समोर आलेली नाही. व्याख्यानाच्या निमित्ताने महाविद्यालयात सकाळी आठपासूनच पोलीस बंदोबस्त होता, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये हातापाईची कसलीही प्रकरणे घडू न देता सुव्यवस्था राखून ठेवण्यात त्यांना यश आले. 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: