इंटरनेट नसणाऱ्यांसाठी ‘एक वर्ग, एक वाहिनी’द्वारे भरणार शाळा

ब्रेनवृत्त, १७ मे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज शिक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. ‘एक वर्ग, एक वाहिनी’ (One Class, One Channel) या योजनेद्वारे ‘डीटीएच’वर इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी नवीन 12 चॅनेल तयार केले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. सध्या असे तीन चॅनल सुरू असून, यांमध्ये आणखी १२ चॅनलची भर पडणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेटच्या सुविधा नाहीत त्यांच्यासाठी हे फायद्याचं ठरेल, अशी माहिती सीतारमण यांनी यावेळी दिली.

आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजच्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आज (ता. १७ ) निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी नवीन निर्णयांविषयी आणि योजनांविषयी माहिती दिली. यावेळी बोलताना सीतारमण म्हणाल्या, ‘स्वयंप्रभा’ डीटीएच चॅनलच्या माध्यमातून थेट परस्परसंवादी वाहिनीसाठी (Live Interactive Channel) चॅनलसाठी काम केलं जाईल. या माध्यमांतून शिक्षकांचे वर्ग थेट चॅनलवर दाखवले जाणार आहेत. टाटास्काय आणि एअरटेलही हे शैक्षणिक व्हिडिओ दाखवतील. तसेच, देशातील १०० विद्यापीठांमध्ये ३० मेपर्यंत ऑनलाईन कोर्स सुरु होतील.

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वर्गासाठी नवे १२ चॅनल्सवर ‘ई-पाठशाला’ अंतर्गत २०० नव्या पुस्तकांचा समावेश केला आहे. खाजगी डीटीएच ऑपरेटर्सचीही या ऑनलाईन वर्गासाठी मदत घेतली जाईल. असं त्या म्हणाल्या. तसेच, विद्यार्थी व पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल कार्यक्रमही सुरू होतील. तसेच, दिव्यांगासाठी विशेष शिक्षण सामग्री तयार करण्यात येईल.

यावेळी त्यांनी २० लाख कोटी रूपयांच्या पॅकेजमधून गरिबांना दिल्या जाणाऱ्या मदतीचीही माहिती दिली. यासंबधी बोलताना त्या म्हणाल्या, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गरिबांना व स्थलांतरित मजुरांना मदत देण्यात आली आहे. आतापर्यत जनधन खात्यात १० लाख २२५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. विविध योजनातंर्गत १६ हजार ३९४ कोटींची मदत जमा करण्यात आली आहे. त्याचबरोबर २५ कोटी गरीब, मजुरांना गहु, तांदूळ मोफत वाटप करण्यात आले, अशी माहितीही सीतारामन यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: