गोव्याच्या रस्त्यांवर ‘इलेक्ट्रिक बस’ची फेरी

मराठीब्रेन वृत्त

पणजी, ३० नोव्हेंबर

गोव्याच्या सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात लवकरच एक नवा बदल बघायला मिळणार आहे. गोव्यातील सार्वजनिक वाहतूकीसाठी कार्यरत असलेले कदंब महामंडळ लवकरच १०० विद्युत बसगाड्या नागरिकांसाठी उपलब्ध करून देणार आहे.

रस्त्यांवर वाहनांचे वाढते प्रमाण आणि त्यांतील इंधनांमुळे होणारे पर्यावरणाचे प्रदूषण टाळण्यासाठी सगळीकडे विद्युतवर चालणाऱ्या वाहनांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. यातच एक उद्यमी पाऊल म्हणून लवकरच गोव्याच्या रस्त्यांवर विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या बसगाड्या धावणार आहेत. गोव्यात सार्वजनिक वाहतूकीचे कार्य करणारे ‘कदंब महामंडळ’ आणि ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी)’ यांच्यात नुकताच एक सामंजस्य (Memorandum of Understanding) करार झाला आहे. या करारानुसार लवकरच १०० विद्युतचलित (इलेक्ट्रिक) बसगाड्या गोव्याच्या राज्यांतर्गत मार्गांवर धावणार आहेत. या बसगाड्या एनटीपीसी पुरवणार आहे व सोबतच गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे कामही एनटीपीसी करणार आहे.

 

● कदंब आणि एनटीपीसी करारातील मुद्दे :

१. राज्यातील रस्त्यांवर धावणाऱ्या बसगाड्या, तसेच दुचाकी किंवा चारचाकी वाहनांना इलेक्ट्रिक चार्जिंगसाठी सोय करण्याची तरतूद.

२. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या आघाडीच्या पेट्रोलियम कंपन्यांचाही या सामंजस्य करारात समावेश.

३. पंचवीस ते तीस बसगाड्या एका टप्प्यात याप्रमाणे चार टप्प्यात वर्षभरात एकूण १०० विद्युतचलित बसगाड्या घेतल्या जातील.

४. यासाठी कदंब महामंडळ एनटीपीसीला प्रति किलोमीटरमागे ४७ ते ४९ रुपये भाडे देईल.

५. दिवसाकाठी २०० किलोमीटर बस धावणे गरजेचे आहे. यामुळे कदंब महामंडळाचा प्रति किलोमीटर तीन ते चार रुपये खर्च वाचेल. अशाप्रकारे एका बसवर कदंबचे वर्षाकाठी तीन लाख रुपये वाचण्याचा दावा या करारात करण्यात आला आहे.

६. एकदा चार्ज केल्यानंतर ह्या विद्युत बसगाड्या १२० किलोमीटरपर्यंत धावतील.

सध्या या कराराची फाईल शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. जर मंजूरी योग्य त्या कालावधीत मिळाली, तर जून २०१९ पर्यंत ही योजना प्रत्यक्ष अंमलात येईल. करारावर सह्या झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील आणि यासाठीची संपूर्ण गुंतवणूक एनटीपीसीतर्फे केली जाणार आहे. हे सर्व प्रत्यक्षात आल्यावर, देशात विद्युतचलित बसगाड्यांद्वारे सार्वजनिक वाहतूक पुरवणारे कदंब महामंडळ हे ‘देशातील पहिले महामंडळ’ ठरणार असल्याचा दावाही संबंधित करारबद्ध संस्थांकडून करण्यात आला आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: