तटरक्षक दलाच्या ‘सचेत’ जहाज व दोन आंतररोधी नौकांचे जलावतरण

ब्रेनवृत्त, १६ मे

भारतीय तटरक्षक दलाचे (ICG-Indian Coast Gaurd) ‘सचेत’ जहाज आणि दोन आंतररोधी नौका (आयबी) ‘C-450’ आणि ‘C-451’ यांचे जलावतरण करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या जहाज आणि दोन्ही नौकांचे जलावतरण केले. संपूर्णतः स्वदेशी पद्धतीने संरचित आणि निर्मित केलेले ‘आयसीजीएस सचेत’ (ICGS Sachet) हे पाच समुद्र गस्त जहाजांच्या (ओपीव्ही) शृंखलेतील पहिले जहाज असून अत्याधुनिक आणि दळणवळण उपकरणांनी सुसज्ज आहे.

आयसीजी आणि जीएसएलचे डिजिटल माध्यमातून जलावतरण करण्याच्या या उपक्रमाचे कौतुक करताना राजनाथ सिंह म्हणाले, “ही जहाजे नौदलाच्या सेवेत रुजू होणे हा भारताच्या किनाऱ्यांची क्षमता वाढवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच, ‘कोव्हिड-19’ सारखे आव्हान समोर असताना देखील या जहाजांची निर्मिती म्हणजे देशाची सुरक्षा आणि संरक्षणासाठी आमची वचनबद्धता आणि दृढनिश्चयाचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. ‘आमचे सागरी रक्षक’ आयसीजी आणि भारतीय जहाजबांधणी उद्योगाचे वाढते सामर्थ्य ही देशासाठी अभिमानाची बाब आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिजन सागर’ (या क्षेत्रातील सर्वांची सुरक्षा आणि प्रगती) बद्दल संरक्षण मंत्री म्हणाले की, महासागर हे केवळ आपल्या देशाचेच नव्हे तर जागतिक समृद्धीची जीवनवाहिनी आहे. सुरक्षित, संरक्षित आणि स्वच्छ समुद्र आपल्या राष्ट्र निर्मितीसाठी आर्थिक संधी प्रदान करतात. भारत ही उदयोन्मुख सागरी सत्ता आहे आणि आपली समृद्धी देखील मोठ्याप्रमाणात समुद्रावर अवलंबून आहे. आपण एक जबाबदार सागरी सत्ता असल्याने समुद्र हे सरकारचे प्राधान्य आहे, असेहइ ते म्हणाले.

समुद्र किनाऱ्यांच्या संरक्षणात आयसीजीच्या भूमिकेचे कौतुक करताना राजनाथ सिंह म्हणाले की, “जगातील चौथ्या क्रमांकाचे तटरक्षक व विश्वासार्ह दल म्हणून त्याने स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. हे केवळ आपल्या समुद्र किनाऱ्यांचे आणि किनारपट्टीवरील नागरिकांचे संरक्षण करत नाहीत, तर विशेष आर्थिक क्षेत्रांतील (SEZ : Special Economic Zones) आर्थिक उपक्रम आणि सागरी वातावरणाचे देखील संरक्षण करतात.”

छायाचित्र स्रोत : ट्विटर

जलावतरणाच्या भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक कृष्णा स्वामी नटराजन म्हणाले की, जलावतरणाच्या या कार्यक्रमाने हे सिद्ध केले आहे की ‘कोव्हिड-१९’ मुळे उद्भवणाऱ्या संकटांवर मात करत आयसीजीने आपले कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. ते म्हणाले की, आयसीजी जहाजांच्या ताफ्यात नवीन जहाजे समाविष्ट झाल्यामुळे आयसीजीचा समुद्रावर कायम सतर्क राहण्यास आणि ‘कोव्हिड-१९’ च्या विरोधातील देशव्यापी लढाईत हातभार लागेल.

105 मीटर लांबीचे ‘सचेत’ जहाज अंदाजे 2,350 टन विस्थापन क्षमतेचे असून, यास 6000 नौटिकल मैल क्षमतेसह 26 समुद्री मैलाची कमाल गती प्राप्त करण्यासाठी डिझाईन केलेली दोन 9100 केडब्ल्यू डीझेल इंजिने बसविण्यात आली आहेत. हे जहाज दुहेरी-इंजिन हेलिकॉप्टर आणि चार वेगवान नौका स्विफ्ट बोर्डिंग आणि शोध आणि बचाव कार्यासाठी एक इंफ्लेटेबल बोट वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे जहाज समुद्रातील तेल गळतीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काही प्रदूषण प्रतिसाद उपकरणे नेण्यास सक्षम आहे.

आयबीएस सी-450 आणि सी-451 या नौका स्वदेशी डिझाईनने निर्मित आणि लार्सन व टुब्रो शिपयार्ड, हजीरा यांनी निर्माण केलेले अद्ययावत नेव्हिगेशन आणि दळणवळण उपकरणांनी सुसज्ज आहेत. 30 मीटर लांबीच्या या दोन नौका 45 नॉट्सपेक्षा जास्त वेग मिळविण्यास सक्षम आहेत आणि वेगवान हस्तक्षेप, जवळच्या किनाऱ्यांवर गस्त घालणे आणि कमी जोखमीच्या सागरी कार्यवाहीसाठी डिझाइन केलेल्या आहेत. आयबीची जलद प्रतिसाद क्षमता ही कोणत्याही उदयोन्मुख समुद्री परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी आणि विरोध करण्यासाठी एक आदर्श मंच आहे. सहाय्यक कमांडंट गौरव कुमार गोला आणि सहाय्यक कमांडंट अकिन झुत्शी हे या जहाजाचे अधिकारी आहेत.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: