भारत पाकिस्तानवर खूप मोठी कारवाई करण्यास सक्षम : ट्रम्प
वृत्तसंस्था
वाशिंग्टन, २३ फेब्रुवारी
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तयार झालेल्या तणावाच्या स्थितीला बघता भारत पाकिस्तानवर खूप मोठी कारवाई करू शकतो, असा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी व्हावा यासाठी आम्ही दोघांच्याही संपर्कात आहोत असेही ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आले. याविषयी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० पेक्षा जास्त जवान हुतात्मा झालेत. यामुळे भारतीयांच्या भावना आम्ही समजू शकतो. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अतिशय गंभीर आणि नाजूक स्तरावरचे आहेत.”
दोन्ही देशांत निर्माण झालेल्या तणावाला कमी करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाला कमी करण्यासाठी आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत, असे ट्रम्प म्हणाले. आमची चर्चा सुरू असून या चर्चेत अनेकांचा समावेश आहे. चर्चेत समतोल हे सध्या मोठे आव्हान आहे, असेही ते म्हणाले. भारत खूप मोठी कारवाई करू शकतो असा दावाही त्यांनी केला आहे. ट्रम्प म्हणाले की, “सध्याची परिस्थिती पाहता भारत पाकिस्तानवर खूप मोठी कारवाई करू शकतो. भारतीयांच्या भावना आम्ही समजू शकतो.”
#DonaldTrump says, he understands India's desire for something 'very strong' after #PulwamaTerrorAttack. pic.twitter.com/iVTJ2j0Lwy
— All India Radio News (@airnewsalerts) February 23, 2019
सोबतच, पाकिस्तानला अमेरिकेकडून पाठवला जाणारा निधीही बंद केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अमेरिकेकडून पाकिस्तानला दरवर्षी सुमारे १.३ बिलियन डॉलरचे ( ९३ अब्ज भारतीय रुपये) अर्थसहाय्य केले जाते. मात्र ह्या मदतीचा गैरवापर पाकिस्तानने केला आहे. त्यामुळे हे अर्थसहाय्य देण्याचे बंद करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
◆◆◆