उद्यापासून ‘आयुष्मान भारत’ची सुरुवात

मुंबई, २२ सप्टेंबर

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत’ म्हणजेच ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ चे देशासह महाराष्ट्रातही उद्यापासून शुभारंभ होत आहे. या योजनेमुळे राज्यातील 83.72 लाख कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे.

आयुष्यमान भारत योजनेसोबतच राज्य शासनाची ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ही एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली आहे. रविवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या योजनेचा लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथीगृहातून होणार आहे.

2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार 83.72 लाख कुटुंबांची निवड आयुष्मान योजनेंतर्गत करण्यात आली असून, त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहे. या योजनेत शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा देण्यात येणार आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करुन घेतले जाणार आहे.

राज्यात सध्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांसाठी ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ राबविली जात असून तिचा लाभ 2 कोटी 23 लाख कुटुंबाना देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून 971 प्रकारचे उपचार, 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवा देण्यात येत असून प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत उपचारांची सुविधा योजनेतून दिली जात आहे. राज्यातील 484 शासकीय व खासगी रुग्णालयांमार्फत ही सेवा दिली जात आहे. आतापर्यंत 19 लाखांहून अधिक शस्त्रक्रिया योजने अंतर्गत करण्यात आल्या आहेत.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: