१५ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द
ब्रेनवृत्त, २६ जून
कोरोना विषाणूची साथ आटोक्यात येत नसल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा १५ जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे. यामुळे १५ जुलैपर्यंत प्रस्तावित असणारी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची उड्डाणे बंद असणार आहेत. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने यासंबंधी आदेश जारी केला आहे. मात्र, हा आदेश ‘आंतरराष्ट्रीय कार्गो ऑपरेशन’ तसेच नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून संमती मिळालेल्या विमानांना लागू असणार नाही.
‘कोव्हिड-१९’च्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे देशातील सर्व व्यावसायिक विमान उड्डाणे स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे विमान सेवा क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, देशांतर्गत प्रवासी विमानसेवा २५ मेपासून टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा कधी सुरू होईल, याबाबतची अनिश्चितता अद्याप कायम आहे.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
दरम्यान, 25 मार्च रोजी कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन अस्तित्त्वात आल्याने भारताने सर्व व्यावसायिक प्रवासी उड्डाणे बंद केली. त्यानंतर, आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. तथापि, 25 मे पासून देशांतर्गत उड्डाणांना परवानगी देण्यात आली.
त्याचप्रमाणे, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर देशांकडून भारतात उड्डाणे सुरू करण्याचे प्रस्ताव आले होते. त्यानंतर भारतानेही अनेक देशांकडून आलेल्या प्रवासाच्या विनंत्या विचारात घेतल्या. त्यानुसार, भारत-अमेरिका, भारत-फ्रान्स, भारत-जर्मनी, भारत-ब्रिटन यांच्यात वैयक्तिक द्विपक्षीय हवाई मार्गिका" (Bilateral Bubbles) स्थापन करण्याची शक्यताही भारत पाहत आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय व स्वदेशी उड्डाणांद्वारे अडकलेल्या लोकांना त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी 6 मेपासून ‘वंदे भारत अभियाना’ची (Vande Bharat Mission) सुरुवात करण्यात आली आहे.