नवोदय विद्यालयात २१-२२ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थी सोहळ्याचे आयोजन

ब्रेनवृत्त | प्रादेशिक

प्रतिनिधी, गोंदिया

जिल्ह्याच्या नवेगाव बांध येथील जवाहर नवोदय विद्यालयात ‘माजी विद्यार्थी मेळावा’ येत्या २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. शाळेतून शालेय शिक्षण घेऊन वर्तमान स्थितीत उच्च शिक्षण घेणाऱ्या, तसेच विविध पदांवर राहून व उपक्रमांतून समाजाला सेवा देणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांना या सोहळ्यासाठी शाळा प्रशासनातर्फे आमंत्रित करण्यात आले आहे.

छायाचित्र : जवाहर नवोदय विद्यालय, नवेगाव बांध, गोंदिया

ग्रामीण भागातील गरीब व हुशार विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे निवासी शिक्षण देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे संचालित, जिल्ह्यातील ‘जवाहर नवोदय विद्यालय, नवेगाव बांध’ या शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘माजी विद्यार्थी सोहळा’ येत्या २१ व २२ डिसेंबर रोजी नियोजित आहे. विविध क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणारे विद्यार्थी घडवणारी व मुलांचा सर्वांगीण विकास घडवून आणणारी शाळा म्हणून जिल्ह्यात नवोदय विद्यालयाचे नावलौकिक आहे. शाळेतून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आज समाजात वेगळे स्थान मिळविले आहे, तसेच विविध क्षेत्रांत ते विविधांगी कामगिरी बजावत आहेत. अशा सर्वांचे मार्गदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांना लाभावे, तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळावी, याकरिता शाळेत दरवर्षी माजी विद्यार्थी सोहळ्याचे आयोजन होत असते. याप्रसंगी देशाच्या विविध भागांतून, तसेच विदेशात कार्यरत असलेले शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र येतात आणि शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांशी हितगुज साधतात. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजनही करण्यात येते.

गडमाता देवराईचे संवर्धन, मात्र बाजूची टेकडी वृक्षहीनच !

यावर्षीच्या माजी विद्यार्थी सोहळ्याच्या तारखा शाळा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आल्या असून, येत्या २१ व २२ डिसेंबर २०१९ ला हा सोहळा आयोजित आहे. तरीपण, या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन शाळेचे प्राचार्य श्री. एम. एस. बलवीर व शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात आले आहे. या सोहळ्यासंबंधी अधिक माहितीसाठी किंवा इतर मदतीसाठी शाळेला किंवा माजी विद्यार्थी संघटनेच्या 9422545903 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावे, असे आवाहनही माजी विद्यार्थी संघटनेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: