‘केव्हीआयसी’च्या मदतीने सशस्त्र दल टाकणार ‘स्वावलंबी भारत’चे पहिले पाऊल !
ब्रेनवृत्त, मुंबई
भारताने ‘स्वावलंबी’ (आत्मनिर्भर) होण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंना, उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केल्यानंतर, त्याला प्रतिसाद देत गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व निमलष्करी दलांची उपहारगृहे आणि दुकानांमध्ये केवळ स्वदेशी उत्पादनांची विक्री बंधनकारक केली आहे. विशेषतः कुटिरोद्योग, तसेच खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यावर त्यांनी भर दिला आहे. या निर्णयामुळे शेतकरी, बेरोजगार युवक आणि कुटीर उद्योग, तसेच ग्रामोद्योग क्षेत्रातील अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
गृहमंत्रालयाने १५ मे रोजी यासंदर्भातला आदेश जारी करुन या निर्णयाची अंमलबजावणी १ जून २०२० पासून केली जावी, असे सांगितले होते. या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाल्यावर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF : Central Armed Police Force) उपहारगृह आणि दुकानांमध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची (KVIC : Khadi and Village Industries Commission) उत्पादने विक्रीला ठेवली जातील. “केंद्रीय पोलीस कल्याण भांडारने १७ उत्पादनांची ऑर्डर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला दिली आहे. आता ‘केंद्रीय पोलीस कल्याण भांडार’मध्ये (केपीकेबी) केवळ स्वदेशी उत्पादनांची विक्री करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. या आदेशानुसार, केपीकेबी आवश्यक वस्तूंची मागणी खादी आणि ग्रामोद्योगकडे करावी”, असे या आदेशात म्हटले आहे.
कामगार टंचाई भरून काढण्यासाठी राज्यात स्थापन होणार ‘कामगार केंद्र’
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी गृहमंत्रालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे देशातील कुटिरोद्योग, तसेच खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रांना मोठे पाठबळ मिळेल, या क्षेत्रातील लाखो कामगारांना त्याचा लाभ होईल, असे सक्सेना म्हणाले. निमलष्करी दलातील 10 लाखांपेक्षा अधिक जवान आता कुटिरोद्योग तसेच खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राचे थेट ग्राहक बनतील. तसेच, या निर्णयाचे स्वागत म्हणून ‘केव्हीआयसी’देखील सीएपीएफच्या कॅन्टीनला केवळ 3% लाभ ठेवून माल विकणार आहे, असेही सक्सेना यांनी सांगितले.
सध्या, देशात 20 प्रमुख भांडार असून, त्यांची वार्षिक उलाढाल १,८०० कोटी रुपये आहे. या एकूण उलाढालीत ‘केव्हीआयसी’ला मोठा वाटा मिळण्याची शक्यता आहे. सध्या, खादी आयोगाने सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये १७ उत्पादनांसाठी नोंदणी केली आहे. यात खादी राष्ट्रध्वज, मध, लोणची, खाद्यतेल असे खाद्यपदार्थ, उदबत्ती, पापड, आवळ्याची उत्पादने, सुती टॉवेल अशा वस्तू आहेत. आणखी ६३ वस्तूंची यादी खादी व ग्रामोद्योग आयोगाने सीएपीएफच्या कॅन्टीनला दिली असून, आगामी काळात त्यांचेही ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे.
◆◆◆