दीर्घकाळ जपानचे पंतप्रधान राहीलेले शिंजो आबे यांचा राजीनामा
दीर्घकालीन आतड्यांच्या सुजेच्या अल्सरमुळे (Chronic Ulcerative Colitis) त्रास वाढल्याच्या कारणामुळे पंतप्रधान पदावर कायम राहू शकत नसल्याचे सांगत आबे यांनी आज शुक्रवारी संध्याकाळी (स्थानिक वेळेनुसार) आयोजित पत्रकार परिषदेत राजीनामा देण्याचे घोषित केले.
वृत्तसंस्था | टोकियो
जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवलेले पंतप्रधान शिंजो आबे यांनी दिवसेंदिवस खालावत जाणाऱ्या प्रकृतीच्या त्रासामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. दीर्घकालीन आतड्यांच्या सुजेच्या अल्सरमुळे (Chronic Ulcerative Colitis) त्रास वाढल्याच्या कारणामुळे पंतप्रधान पदावर कायम राहू शकत नसल्याचे सांगत आबे यांनी आज शुक्रवारी संध्याकाळी (स्थानिक वेळेनुसार) आयोजित पत्रकार परिषदेत राजीनामा देण्याचे घोषित केले.
मागील काही महिन्यांपासून आजाराशी लढा देत असलेले जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पुढे नेतृत्व करणे शक्य नसल्याचे सांगत अखेर आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. “जपानमधील ‘कोव्हिड-१९’चा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाला असून, हिवळ्याच्याही पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची आता ही योग्य वेळ आहे”, असे आबे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. पंतप्रधानपदाचा राजीनामा देताना शिंजो आबे भावूक झाले. आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली. “मी ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागत असल्याने प्रचंड वेदना होत आहेत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे प्रकृतीच्या कारणांमुळे पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या होत्या. दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालल्याने त्याचा परिणाम सरकारवर आणि सरकारी कामावर होऊ नये यासाठी आबे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर आज शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.
वाचा | चीनची ‘फाइव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटजी’ काय आहे ?
दीर्घ आजारानं त्रस्त असलेले शिंजो आबे पंतप्रधान पदाचा राजीनामा देताना भावूक झाले होते. आपला कार्यकाळ पूर्ण न करू शकल्याने त्यांनी जनतेची माफी मागितली आहे. “दीर्घ आजारामुळे आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मी जनतेची मनापासून माफी मागतो. मी माझं कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नाही. मी काही उद्दिष्ट निश्चित केली होती. ती पूर्ण होण्याआधीच राजीनामा द्यावा लागत असल्याने मनाला वेदना होत आहेत,” अशा भावना आबे यांनी व्यक्त केल्या.
Abe declines to endorse anyone as his successor and says he will entrust the LDP to choose the next prime minister.
— The Japan Times (@japantimes) August 28, 2020
दरम्यान, राजीनामा देताना शिंजो आबे यांनी त्यांच्या उत्तराधिकारीच्या नावाची घोषणा केली नाही. नवीन उत्तराधिकारी नेमण्याचे अधिकारी त्यांनी एलडीपीला (LDP : Liberal Democratic Party) दिले आहेत. तसेच, जर त्यांची प्रकृती सुधारली, तर कनिष्ठ सदनाची पुढील निवडणूक लढवून ते कायदेमंडळाचे सदस्य असण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. सोबतच, “नवीन उत्तराधिकारी पंतप्रधान पदावर येईपर्यंत पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचेही आबे यांनी म्हटले आहे.
सन २००७ मध्येही आबे यांनी विद्यमान आतड्यांच्या आजाराच्या वाढत्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला होता. ते पंतप्रधान पदावर एक वर्ष अधिक, म्हणजेच सप्टेंबर, २०२१ पर्यंत पदावर कार्यरत राहिले असते.