भ्रमाचा फुगा फुटला आणि सारं चित्रच बदललं!

स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करावे लागतात, स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत करावी लागते. तेव्हाच स्वप्नांची पूर्तता होते. भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहिलेच नव्हते, तर उलट हा विश्वचषक आपलाच आहे या फाजील ‘अति’आत्मविश्वासाने त्यांना ग्रासले होते. आणि या अतिआत्मविश्वासाचे फळ उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाच्या पदरात पडले.

 

ब्रेन साप्ताहिकी | १४ जुलै, २०१९

गोपाळ दंडगव्हाळे (@GopalDandgavale)

 

आज १४ जुलै! एक दीड महिन्यापासूनच आजचा दिवस प्रत्येक भारतीयाने राखून ठेवला होता. का? तर भारतीय संघ अंतिम सामना खेळेल या भाबड्या आशेवर. आशा खरोखरच वेडी असते. तशीच आशा बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या उपांत्य सामन्यात प्रत्येक भारतीयाने टीम इंडियावर ठेवली होती, धोनीवर ठेवली होती. जे आशेचं तेच स्वप्नांचंही. भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात पराभव झाला आणि एकशेतीस कोटी भारतीयांचा स्वप्नभंग झाला. संपूर्ण विश्वचषकात सर्वोत्तम खेळ करणाऱ्या भारतीय संघाविषयी या सामन्यात सारे काही अविश्वसनीय व अनाकलनीय घडले. आणि बुधवारच्या संध्याकाळी करोडो भारतीयाच्या तोंडून एकच शब्द उत्स्फूर्तपणे निघाला, तो म्हणजे “संपलो”!

स्वप्ने ही कधी कधीच पूर्ण होतात, तर कित्येकदा ती हवेत विरून जातात. अशाच प्रकारचे विश्वचषक जिंकण्याचे जे स्वप्न आपण व भारतीय संघाने बघितले होते, पण मुळात ते स्वप्न नव्हतेच. स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करावे लागतात, स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत करावी लागते. तेव्हाच स्वप्नांची पूर्तता होते. भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहिलेच नव्हते, तर उलट हा विश्वचषक आपलाच आहे या फाजील ‘अति’आत्मविश्वासाने त्यांना ग्रासले होते. आणि या अतिआत्मविश्वासाचे फळ उपांत्य सामन्यात टीम इंडियाच्या पदरात पडले.

यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा एक सामना वगळता सर्वच सामने जिंकले. पण या सर्व विजयांत दिसले ते फक्त वैयक्तिक विक्रम. संघभावना, भागीदाऱ्या कुठे दिसल्याच नाहीत. विजयाच्या वारूवर आरूढ असलेल्या भारतीय संघाला क्रिकेट हा वैयक्तिकतेचा नाही, तर संघभावनेचा खेळ आहे हे कोणी सांगितलेच नाही. कारण यशाला उपदेशाचे डोस पाजण्याची पद्धत आपल्याकडे नाही व त्याचाच परिणाम न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आपण सर्वांनी पाहिला.

संपूर्ण विश्वचषकात भारताच्या पहिल्या तीन-चार फलंदाजांनी फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली, त्यामुळे मधल्या फळीवर फलंदाजीची जबाबदारी आलीच नाही. परिणामी टीम इंडियासह संघ व्यवस्थापनही बेफिकीर राहिले. आणि ह्या मधल्या फळीकडे कोणी फारसे गंभीरपणे पाहिले नाही. त्याचाच फटका उपांत्य सामन्यात टीम इंडियाला बसला आणि हा फटका असा काही बसला, की टीम इंडिया विश्वचषकातून थेट बाहेरच फेकली गेली. जायबंदी होऊन गब्बर(शिखर धवन) व शंकर मायदेशी परतले आणि डिके (दिनेश कार्तिक) , पंत व मयंक अग्रवाल पाठवले गेले. पण ह्यांनी तरी किती दिवे लावले? तिकडे इंग्लंडमध्येच अजिंक्य रहाणे कौंटी खेळतोय, त्यात शतक झळकवतोय, मात्र चौथ्या क्रमांकावर अगदी फिट बसणाऱ्या या गुणी खेळाडूला संघ निवड समितीने दूर ठेवले. त्याच बरोबर संघासोबत रवींद्र जडेजा होता, त्याच्याकडेही संघव्यवस्थापनाने कानाडोळा केला. मात्र त्याच जडेजाने शेवटच्या दोन सामन्यात आपले अस्तित्व किती मौल्यवान आहे हे जगाला दाखवून दिले.

चौथ्या क्रमांकावर संघातील सर्वोत्तम खेळाडू खेळत असतो. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर कायम चौथ्या क्रमांकावर खेळत असे. तंत्रशुद्ध, डाव सावरण्याची क्षमता असलेल्या तुफान फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजासाठीच चौथा क्रमांक असतो याचे भान विराट कोहलीला राहिले नाही. जगज्जेते आम्हीच आणि विश्वचषकही आमचाच हा जो अहंकार होता तो अहंकार नडला. या निमित्ताने जगज्जेता असल्याचा दावा करणारा संघ किती पोकळ होता, हे साऱ्या जगाने पाहिले.

हार जीत जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे खरे असले तरी, हार कशाप्रकारे स्वीकारावी याचेही काही निकष आहेत. भारतीय क्रिकेटपटूंनी मात नाही, तर माती खाल्ली असेच या पराभवाचे विश्लेषण करावे लागेल. चाहत्यांनी पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारायला हवा, असे भारतीय संघाच्या पराभवानंतर बोलले जात होते. पण क्रिकेटला धर्म आणि आवडत्या खेळाडूला देव मानणाऱ्या या देशात चाहत्यांकडून पराभवानंतर खिलाडू वृत्तीची अपेक्षा करणे अतिशयोक्तीच ठरेल. शेवटी भारतीय संघ दळभद्री व भारतीय क्रिकेटपटू कर्मदारिद्री निघाले. त्याचं परिणाम म्हणून भारतीय क्रिकेट बुधवारी ढसाढसा रडले.

भारताच्या विश्वचषकातून अकाली बाहेर पडण्यामुळे क्रिकेट रसिकांप्रमाणेच आयसीसीलाही जबर धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेटरसिकांच्या भावनांचा उद्रेक आणि कडेलोट होत असतानाच आयसीसीच्या मार्केटिंगचेही गणित चुकले आहे. नियतीने आणि यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेने जगाला नवीन विजेता देण्याचे ठरवले आहे. गेल्या पाच दशकात एकदाही विश्वचषक न जिंकता आलेले यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड ‘क्रिकेट विश्वचषक २०१९’ पटकवण्यासाठी आणि जगज्जेता होण्यासाठी आज लॉर्ड्सवर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. एक आठवड्यापूर्वी जर असं कुणी म्हटले असते, तर यावर कुणीच विश्वास ठेवला नसता. पण क्रिकेट हा खेळ आहेच असा अनिश्चिततेचा.

सर्वात दुबळा संघ अशी प्रतिमा असलेल्या न्यूझीलंडने भारताला जसा धक्का दिला, तसा पराक्रम त्यांच्याकडून आजही होऊ शकतो. मात्र विद्यमान फॉर्म, घरच्या प्रेक्षकांचे पाठबळ, स्थानिक हवामान व खेळपट्टीची असलेली जाण, या सर्व गोष्टींच्या जोरावर इंग्लंड संघ अंतिम सामन्याआधीच फेव्हरेट समजला जातोय. आता कधीही विश्वचषक न जिंकलेला न्यूझीलंड संघ विश्वचषक जिंकेल, की ते प्रथमच जन्मदात्याच्या घरी जाईल, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

 

(छायाचित्रे स्रोत : गुगल)

(लेखक हे पत्रकार आहेत. मूळ लेख लेखकाच्या वैयक्तिक ब्लॉगवर प्रकाशित.)

◆◆◆

 

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: