मारुती सुझुकीच्या वाहन उत्पादनात सलग नववी घट!
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक ‘मारुती सुझुकी’ कंपनीच्या उत्पादनात सलग नवव्या महिन्यातही घट झाली आहे. मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील उत्पादनाच्या तुलनेत या यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये वाहन उत्पादनात सुमारे २१ टक्क्यांची घट झाली आहे. आर्थिक मंदीच्या पेचात सापडलेली ही कंपनी गेल्या नऊ महिन्यांपासून घट अनुभवत आहे.
ब्रेनवृत्त | ब्रेनअर्थ
देशातील सर्वात मोठ्या कारनिर्मात्या ‘मारुती सुझुकी’ कंपनीचा उत्पादनातील उतरता प्रवास अजूनही थांबलेला नाही. सलग नवव्या महिन्यातही मारुती सुझुकीच्या उत्पादनात जवळपास २१ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील एकूण 1,50,497 गाड्यांच्या उत्पादनाच्या तुलनेत यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात एकूण 1,19,337 गाड्यांंचेच उत्पादन झाले असल्याचे मारुती सुझुकी इंडियाने त्यांच्या नियामक प्रणालीत (रेगुलेटरी फायलिंग) जाहीर केले आहे.
छायाचित्र स्रोत : Business Minds Today
गेल्या नऊ महिन्यांपासून आर्थिक संकटातून जात असलेल्या ‘मारुती सुझुकी’, या सर्वात मोठ्या प्रवाशी वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे उत्पादन अजूनही कमीच राहिले आहे. सलग नवव्या महिन्यातही मारुती सुझुकीचे उत्पादन कमी राहिले. मारुती सुझुकीच्या वाहन उत्पादनात सुमारे २०.७ टक्क्यांनी घट झाली आहे, असे ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या उत्पादनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. यांपैकी प्रवास वाहनांच्या उत्पादनात तब्बल २०.८५ % टक्के इतकी घट झाली आहे. २०१८ सालच्या ऑक्टोबर महिन्यात कंपनीद्वारे उत्पादित वाहनांची संख्या 1,48,318 इतकी होती, ती यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात 1,17,383 एवढी आहे.
दुसरीकडे लहान आणि छोट्या आकाराच्या कार उत्पादनातही घट झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने अल्टो, न्यू वॉग्नोर आर, सेलेरिओ, इग्निस, स्विफ्ट, ब्लेनो आणि डिझायर यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात या गाड्यांचे उत्पादन 85,064 इतकेच राहिले, जे मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात 1,08,462 इतके होते. म्हणजे ही उत्पादनात आलेली एकूण २१.५७ टक्क्यांची घट आहे.
सोबतच, मध्यम आकाराच्या सियाझ (Ciaz) मॉडेलचेही उत्पादन ३५१३ (ऑक्टोबर, २०१८) वरून या ऑक्टोबरमध्ये 1,922 वर घसरले.
दरम्यान, सणासुदीच्या या काळात वितारा ब्रेझा, एर्टीगा आणि एस-क्रॉस यांसारख्या युटिलिटी वाहनांच्या उत्पादनात किरकोळ वाढ झाली आहे. यांमध्ये मागील वर्षीच्या 22,526 गाड्यांच्या तुलनेत यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये एकूण 22,736 इतके उत्पादन झाले आहे.
मात्र, भारतीय बाजारपेठेत निर्माण झालेले आर्थिक संकट आणि त्यामुळे ग्राहकांकडून कमी होत चाललेली खरेदी यांचा मोठा परिणाम मारुती सुझुकीवर झाला आहे. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात कंपनीचे एकूण उत्पादन 17.48 टक्क्यांनी कमी होऊन 1,32,199 इतके राहिले होते व ऑक्टोबर महिन्यात ते अजून कमी झाले.
(आकडेवारींच्या व्यतिरिक्त इतर सर्व मजकूर हे पूर्णतः मराठीब्रेन डॉटकॉमच्या संपादन टीमतर्फे मूळ रुपात लिखित आहे.)
◆◆◆