उपनगरीय रेल्वेच्या सुमारे ४५% महिला प्रवासी असुरक्षित

मुंबई रेल्वे विकास महामंडळाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या दरदिवशी सुमारे ४५ टक्के महिलांना असामाजिक घटकांचा व छळवणुकीला सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

ब्रेनवृत्त, मुंबई

मुंबई उपनगरीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या जवळपास ४५ टक्के स्त्रियांना असामाजिक घटकांकडून होणाऱ्या त्रासाला व छळवणुकीला सामोरे जावे लागते, अशी माहिती एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एका खाजगी संस्थेने मदतीने विरार-डहाणू व नेरळ-कर्जत या रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या महिलांचे सर्वेक्षण केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

उपनगरीय रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या महिलांना असामाजिक घटकांच्या त्रासाला व छळाला सामोरे जावे लागते, हे बाब पुन्हा उघड झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू व मध्य रेल्वेच्या नेरळ ते कर्जत स्थानकांदरम्यान प्रवास करणाऱ्या महिलांचे मुंबई रेल्वे विकास महामंडळ व एका संस्थेद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणदरम्यान महिला प्रवाशांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिलांच्या डब्ब्यात महिला सुरक्षा रक्षक असाव्यात, अशी मागणीही रेल्वे विभागाकडे केली आहे.

सर्वेक्षणासंबंधी एबीपी माझा ने प्रसारित केेेलेेल्या एका वृत्तानुसार, विरार ते डहाणू दरम्यान प्रवास करणाऱ्या 45 टक्के, नेरळ ते कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या 40 टक्के महिलांनी प्रवासात छळवणूक होत असल्याचे सांगितले. लोकलसाठी स्थानकांत होणाऱ्या गर्दीसोबतच काही असामाजिक घटकांकडून दिला जाणारा त्रासही जास्त असल्याचे मत अनेक महिलांनी व्यक्त केले आहे. विरार-डहाणू मार्गे त्रास सहन करावा लागणाऱ्या ४५ टक्के महिलांपैकी फक्त एक चतुर्थांश, म्हणजे २५ टक्के महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. तर काही महिला हेल्पलाईन क्रमांकाच्या मदतीने आपली समस्या सोडवतात. विशेष म्हणजे, अनेक महिला प्रवाशांनी स्थानकात प्रवेश करताना अनधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, फेरीवाले यांच्यामुळेही त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले आहे.

दुसरीकडे, मध्य रेल्वेच्या नेरळ ते कर्जत स्थानकांवरचीही स्थिती काही फारसी वेगळी नाही. येथून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांनी लोकल डब्यात आसनव्यवस्था उपलब्ध होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. जवळपास 10 पैकी 4 महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान काही असामाजिक घटकांकडून छळवणूक व अन्य त्रास सहन करावा लागतो. यांपैकी सुमारे ६० टक्के महिला पोलिसांकडे तक्रार दाखल करतात, तर फक्त 13 टक्के महिला हेल्पलाइनचा आधार घेतात.

मिरर नाऊच्या च्या एका वृत्तानुसार, उपनगरीय रेल्वेतील गर्दीमुळे खाली पडून व दगावून मागील तीन वर्षांमध्ये जवळपास १८४ महिला प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. जवळपास ३० लाख महिला दरदिवशी लोकल ट्रेनने प्रवास करतात.

 

◆◆◆

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: