लावा इंटरनॅशनल तिचे उद्योग भारतात हलवणार

ब्रेनवृत्त, १७ मे

मोबाईल साहित्य बनविणारी देशांतर्गत ‘लावा इंटरनॅशनल’ कंपनी चीनमधील प्रकल्प कायमचा बंद करून भारतात येत आहे. ही कंपनी आता भारतातून चीनला मोबाईल निर्यात करणार आहे. यासाठी पुढील पाच वर्षांत भारतात ८०० कोटी रुपये गुंतविण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष हरी ओम राय यांनी नुकतीच दिली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे चीनला मोठा झटका बसला आहे.

हरी ओम राय यांनी सांगितले की, चीनमध्ये उगम झालेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ती पूर्ववत करण्यासाठी खूप मोठा कालावधी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर लावा मोबाईल कंपनीने मोबाईल फोन विकसित आणि उत्पादन करण्यासाठी पुढील पाच वर्षांची योजना बनविली आहे. उत्पादन डिझाईन करण्याच्या क्षेत्रात आमचे चीनमध्ये जवळपास ६०० ते ६५० कर्मचारी आहेत. आता हे काम आम्ही भारतात हलविले आहे. भारतातील विक्रीच्या गरजा आम्ही स्थानिक प्रकल्पांतून पूर्ण करणार आहोत.

दरम्यान, भारतातील लॉकडाऊन कालावधीत लावाने चीनकडून आपल्या मोबाईल फोन निर्यातीची मागणी पूर्ण केली. आता हेच काम भारतातून केले जाईल. आता चीनला मोबाईलची उपकरणे निर्यात करण्यास भाग पाडावे, असेही राय म्हणाले. तथापि, भारतीय कंपन्या मोबाईल चार्जर आधीपासूनच चीनला निर्यात करत आहेत. केंद्र सरकारने देऊ केलेली प्रोत्साहन योजना यामध्ये मोठी क्रांती घडवेल. यामुळे चीनमधील पूर्ण प्रकल्प आम्ही भारतात हलवत आहोत.

अलिकडच्या काळात, मोबाईल फोन निर्मितीसाठी भारत एक प्रमुख केंद्र बनला आहे. सध्या भारतात 200 हून अधिक मोबाईल फोन आणि साहित्य (अॅक्सेसरीज) कंपन्या आहेत. कोणत्याही मोबाईल फोन कंपनीसाठी भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे. हे पाहता बऱ्याच  कंपन्यांनी येथे आपले प्रकल्प उभारले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: